ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातली तिसरी वन डे सध्या ख्राईस्टचर्चमध्ये सुरु आहे. या वन डे साठी भारतीय संघात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत मात्र पुन्हा फेल ठरला. त्यावरुन बीसीसीआय चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. कारण गेल्या तिन्ही वन डे सामन्यात रिषभ पंतला खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पंतला अजून किती चान्स देणार असा सवाल विचारला जातोय. दुसरीकडे संजू सॅमसनला मात्र एक मॅच खेळवून ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागत आहे. रिषभ पंतचा फ्लॉप शो रिषभ पंतचा न्यूझीलंड दौऱ्यातला फ्लॉप शो तिसऱ्या वन डेतही सुरुच राहिला. ख्राईस्टचर्चच्या तिसऱ्या वन डेत पंत 10 धावा काढून बाद झाला. या मालिकेत तिन्ही सामन्यात पंतच्या खात्यात केवळ 31 धावा जमा आहे. याऊलट संजू सॅमसननं पहिल्याच वन डेत 36 धावा केल्या होत्या. पण अतिरिक्त बॉलर खेळवण्यासाठी धवननं संजू सॅमसनला विश्रांती देत दीपक हुडाला टीममध्ये खेळवलं.
हेही वाचा - Cricket: नशीब म्हणतात ते याला… डायरेक्ट हिट, बॅट्समन क्रीझबाहेर तरीही अम्पायरनं दिलं नॉट आऊट; पाहा Video टीम इंडियाची खराब सुरुवात दरम्यान ख्राईस्टचर्चमध्ये निम्मा भारतीय संघ 121 धावात माघारी परतला होता. आघाडीच्या फलंदाजांपैकी श्रेयस अय्यरनं 49 धावांची खेळी केली. पण धवन (28) गिल (13), सूर्यकुमार (6) हे खेळाडू लवकर माघारी परतले. दरम्यान या मालिकेत न्यूझीलंड पहिली वन डे जिंकून आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधायची असेल तर भारताला ही वन डे जिंकावी लागणार आहे.