मुंबई, 14 डिसेंबर : अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना चांगली सुरुवात केली आहे. रणजी ट्रॉफीत सध्याच्या हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी त्याने राजस्थानविरुद्ध 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यामध्ये अर्जुनने 8 चौकार आणि एक षटकार मारला. षटकार मारतच त्याने अर्धशतक पूर्ण केलं. अर्जुन अद्याप मैदानात आहे. पहिल्या सामन्यात त्यानं शतक केल्यास तो वडील सचिन तेंडुलकरच्या कामगिरीची बरोबरी करू शकतो. सचिनने 1988 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला होता. त्यानतंर 34 वर्षांनी आता अर्जुन हीच कामगिरी करू शकतो. गोव्याने लंच ब्रेक पर्यंत ११७ षटकात 5 बाद 320 धावा केल्या आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याने पहिल्या डावात 5 बाद 210 वरून खेळ सुरू केला. अर्जुन तेंडुलकर 4 धावांवर खेळत होता. त्याने सहाव्या गड्यासाठी सुयश प्रभुदेसाईसोबत शतकी भागिदारीही केली आहे. सुयशने 292 चेंडूत 128 धावा केल्या असून तोसुद्धा मैदानात आहे. तर अर्जुन सध्या 121 चेंडूत 67 धावांवर खेळत आहे. अर्जुन आणि सुयश यांनी 119 धावांची नाबाद भागिदारी केली आहे. हेही वाचा : इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा शूटिंगवेळी भीषण अपघात, एअरलिफ्टने रुग्णालयात केलं दाखल सचिन तेंडुलकरने 1988 मध्ये गुजरातविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मुंबईकडून खेळताना सचिनने पहिल्याच डावात शतक केलं होतं. तेव्हा सचिन फक्त 15 वर्षांचा होता. रणजी ट्रॉफीत पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. सचिनने 129 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानं नाबाद 100 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तो सामना अनिर्णित राहिला होता. हेही वाचा : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल एकदा बघाच अर्जुन तेंडुलकर टी20 लीगमध्ये आय़पीएलच्या मुंबई इंडियन्स संघात आहे. सध्या गोव्याच्या संघात तो अष्टपैलू म्हणून खेळतो. 23 वर्षांचा अर्जुन वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 9 टी20 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. 10 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 7 सामन्यात 8 गडी बाद केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.