साओ पाउलो, 05 डिसेंबर : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनामुळे श्वसनाशी संबंधित आजारावर पेले यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या मुलींनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून जीवाला कोणताही धोका नाही. कुटुंबातील सदस्य आणि चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
पेले यांच्या मुली केली आणि फ्लाविया नॅसिमेंटो यांनी रविवारी रात्री सांगितले की, पेले यांचा श्वसन ससंर्ग पूर्णपणे ठीक झाल्यानतंर साओ पाउलोमध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आहे. पेले यांच्यावर कॅन्सरमुळे केमोथेरपीसुद्धा सुरू आहे.
हेही वाचा : एम्बाप्पेने केली मेस्सीशी बरोबरी, पेले-रोनाड्लो यांना टाकले मागे
रुग्णालयाकडून शनिवारी सांगण्यात आलं होतं की, पेले हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि गेल्या २४ तासात त्यांची प्रकृती बिघडलेली नाही. केली नॅसिमेंटो यांनी सांगितलं की, ते आजारी आहेत, वयस्क आहेत पण सध्या फुफ्फुसात संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. जेव्हा त्यांना बरं वाटेल तेव्हा घरी नेलं जाईल. सध्या तरी त्यांना रुग्णालयातून लगेच डिस्चार्ज दिला जाणार नाही.
पेले यांना सप्टेंबर २०२१ मध्ये कोलन ट्यूमरचे निदान झाले होते. तेव्हा शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर काढण्यात आला होता. मात्र हा ट्यूमर शरिरात इतरत्र पसरला आहे का याची माहिती देण्यात आली नव्हती. पेलेंची मुलगी फ्लावियाने सांगितलं पेले यांना अजून कॅन्सरपासून मुक्ती मिळालेली नाही. आता ते डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत आहेत.
हेही वाचा : भारताकडून अशा चुका अपेक्षित नव्हत्या, वासिम जाफरने सांगितली पराभवाची 3 कारणे
पेले हे त्यांचे अखेरचे क्षण जगतायत असं लोक म्हणतायत हे चुकीचं आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं फ्लाविया यांनी स्पष्ट केलं. पेले हे उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानतंर त्यांना End-Of-Life Care मध्ये हलवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कुटुंबियांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.