मुंबई, 05 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वासमि जाफरने भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या पराभवावर मत व्यक्त केलं आहे. भारतीय संघाच्या तीन चुका जाफरने सांगितल्या आहेत. तसंच अखेरच्या अर्ध्या तासात संघ दबावाखाली असल्याने पराभूत झाल्याचं म्हटलं. मीरपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला एका विकेटने पराभूत व्हावं लागलं. 186 धावांचे रक्षण करताना भारताने बांगलादेशचे 135 धावात 9 गडी बाद केले होते. पण मेहदी हसन आणि मुस्ताफिजुर यांच्या अर्धशतकी भागिदारीने भारताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. यामुळे बांगलादेशने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
वासिम जाफरने म्हटलं की, शेवटच्या अर्ध्या तासात भारतीय संघ दबावाखाली दिसून आला. यावेळी भारतीय संघाने अशा चुका केल्या ज्याची आपण अपेक्षा करत नाही. यावेळी दीपक चाहरने दोन नो बॉल टाकले. तर केएर राहुलने मेहदी हसनचा झेल सोडला. त्यावेळी मेहदी हसन 15 धावांवर खेळत होता.
हेही वाचा : खराब फलंदाजी, 30-40 धावा कमी, प्रेशर.. पराभवावर रोहित पहिल्यांदाच उघडपणे बोलला
टीम इंडियाकडून मोक्याच्या क्षणी 2 नो बॉल आणि केएल राहुलकडून एक झेल सुटला, तेव्हा असं वाटलं की भारतावर जास्त दबाव होता. कधी कधी आपण पाहतो की भारत अशा स्थितीत चांगलं खेळतो पण बांगलादेशविरुद्ध हे उलट दिसून आलं. भारतीय संघ दबावाखाली होता. भारताने केलेल्या चुका या अनपेक्षित होत्या. 135 वर 9 गडी बाद असताना जर शेवटच्या विकेटसाठी कोणी 50 धावा करत असतील तर तुम्ही खूप निराश व्हाल. इथं कौतुक तर मेहदी हसन आणि मुस्ताफिजूरचे करायला हवे. ज्यापद्धतीने त्यांनी खेळी केली आणि सामना जिंकून दिला त्याचं कौतुक करायला पाहिजे. पण भारत निराश होईल कारण जिंकलेला सामना त्यांना बांगलादेशला जिंकायला दिला असंही जाफरने म्हटलं.
भारताचा माजी क्रिकेटपटू म्हणाला की, कुलदीप पहिलाच सामना खेळत होता, अशा कठीण परिस्थिती भारताने एखाद्या अनुभवी गोलंदाजाला आणायला हवे होते. मीरपूरमध्ये वेगवान गोलंदाजी बॅटवर चांगली जाते आणि स्वत: कुलदीप सेन तिथं जर दबावाखाली असेल तर फिरकीपटूच्या हाती चेंडू दिला असता तर निकाल कदाचित वेगळा असता. याशिवाय इतरही अनेक चुका आपण केल्या.
हेही वाचा : बांगलादेशचा भारतावर वनडेत सहावा विजय; या दिग्गजांच्या नावावरही पराभवाचा डाग
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर 41.2 षटकात भारत 187 धावात गारद झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. दरम्यान, एका बाजून सलामीवीर लिटन दासने संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकवेळ बांगलादेशची अवस्था 9 बाद 135 अशी झाली होती. मात्र अखेरच्या गड्यासाठी मेहदी हसन आणि मुस्ताफिजूर यांनी नाबाद 51 धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket, Rohit sharma, Team india, Virat kohli