मुंबई, 6 जानेवारी : भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज जगभरातून लता दीदींच्या स्मृतिदिनी विविध माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर दीदींच्या आठवणीने भावुक झाला. त्याने ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे नाते फार खास होते. लता दीदी या सचिनला आईप्रमाणे होत्या, तर दीदींनीही त्याला नेहमी मुला सारखे प्रेम दिले. त्यांच्या पहिल्या स्मृती दिनी सचिनने त्यांच्या आठवणीत एक ट्विट केले. त्यात त्याने लता दीदींच्या “तू जहाँ जहाँ रहेगा मेरा साया साथ होगा” या गीताचा उल्लेख केला. सचिनने लिहिले की, “लता दीदी तुम्ही आम्हाला सोडून गेलेल्याला आज एक वर्ष झाले. पण तुमची मायेची सावली नेहमी माझ्या सोबत असेल”.
हे ही वाचा : सचिन तेंडुलकरने मारलेली ‘ती’ हाक लता दीदी कधीच विसरु शकल्या नाहीत गायिका लता मंगेशकर या क्रिकेट खेळाच्या देखील मोठ्या चाहत्या होत्या. त्यांनी अनेकदा कार्यक्रमात याविषयी बोलून दाखवले होते. लता दीदींना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खेळ खूप आवडायचा. सचिन तेंडुलकरने जेव्हा त्याचे नवीन घर घेतले तेव्हा लता मंगेशकर यांनी त्याला ‘तू जहाँ जहाँ चलेगा’ आणि ‘पिया तोसे नैना लागे रे’ हे गीत लिहिलेल्या दोन फ्रेम भेट म्ह्णून दिल्या होत्या.