भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन आहे. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनी विविध माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. गायिका लता मंगेशकर या क्रिकेट खेळाच्या देखील मोठ्या चाहत्या होत्या. त्यांनी अनेकदा कार्यक्रमात याविषयी बोलून दाखवले होते. लता दीदींना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खेळ खूप आवडायचा. सचिन आणि लता दीदींयांचे नाते ही फार आपुलकीचे होते.
लता दीदींनी सचिनच्या क्रिकेटमधील निवृत्तीबाबत बोलताना म्हंटले होते की, सचिन क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा मी फार दुःखी झाले होते. परंतु त्यानंतर मी स्वतःला समजावले की कोणीही नेहमी कायम राहू शकत नाही. सचिनसारखा महान खेळाडू देखील याला अपवाद नाही. मला वाटत होते की त्याने काही अजून काळ खेळायला हवे. पण हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्याला निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ वाटत असेल तर त्याची चाहती म्हणून मला त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
लता दीदी आणि सचिन तेंडुलकर या दोघांचे नाते फार आपुलकीचे होते. सचिन त्यांना 'आई' म्हणत असे. दीदींनी या विषयी सांगताना म्हंटले होते की, "सचिन मला त्याच्या आई प्रमाणे वागवतो. आणि मी देखील त्याच्यासाठी एका आईप्रमाणे प्रार्थना करते. त्याने मला पहिल्यांदा 'आई' म्हटले तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मी याची कल्पनाही केली नव्हती. माझ्यासाठी त्याने मला आई म्हणून हाक मारणे हे सुखद आश्चर्य होते. सचिन सारखा मुलगा मला मिळाल्याने मला धन्य झाल्या सारखे वाटते."
सचिन तेंडुलकरने जेव्हा त्याचे नवीन घर घेतले तेव्हा लता मंगेशकर यांनी त्याला 'तू जहाँ जहाँ चलेगा' आणि 'पिया तोसे नैना लागे रे' हे गीत लिहिलेल्या दोन फ्रेम भेट म्ह्णून दिल्या होत्या.