केरळ, 12 एप्रिल : कोरोनाला (Coronavirus) हरवण्यासाठी देशातील प्रत्येकजण काम करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मग ती मदत पैशांच्या स्वरूपात असो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असो. केरळचा फूटबॉलपटू सी.के.विनीतने (CK Vineeth) एक नवीन आदर्श घालून दिला आहे. भारतामध्ये या काळामध्ये पार पडणाऱ्या अनेक स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खेळांडूंना घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. मात्र विनीतने आदर्श घालून दिला आहे, कारण त्याने मिळालेला हा वेळ सत्कारणी खर्च घातला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये विनीतने त्याचा खारीचा वाटा उचलला आहे. (हे वाचा- ‘धोनी आता टीम इंडियात खेळणार नाही, निरोपाच्या सामन्याशिवाय करणार रामराम’ ) विनीत भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. 7 सामन्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याचप्रमाणे आयएसएल स्पर्धेत तो जमशेदपूर (Jamshedpur FC) या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. सध्या कोरोनाच्या लढ्यात विनीतने घरी न बसता एक वेगळं काम सुरू केलं आहे. जेणेकरून अनेकांना मदत होत आहे.
विनीत केरळ सरकारच्या कोरोनासाठी असणाऱ्या हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करत आहे. नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करण्यासाठी त्याने या कामात सहभाग दर्शवला आहे. या कामाबद्दल बोलताना विनीत म्हणाला की, सध्याच्या खडतर काळात जी काही मदत त्याच्याकडून शक्य आहे, ती तो करण्याचा प्रयत्न करत आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमुळे क्रिकेटला मिस करताय? मग हे फोटो एकदा पाहाच ) केरळमधील प्रसिद्ध फुटबॉलपटू म्हणून लौकिक असणारा विनीत केरळमध्ये परतल्यानंतर Kerala Sports Council ने त्याला या कामाबाबत विचारलं आणि त्यावेळी त्याने तात्काळ याला होकार दिला. विनीतच्या या निर्णयाबाबत सर्वच स्तरावर त्याचं कौतुक केलं जात आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत नमूद करण्यात आले आहे. 28 मार्चपासून त्याने या कामाला सुरूवात केली आहे आणि लॉकडाऊन संपेपर्यंत तो हे काम करणार असल्याची प्रतिक्रिया विनीतने दिली आहे. विनीत ज्याठिकाणी हेल्पसेंटरमध्ये काम करतो त्याठिकाणी सॅनिटायझेशनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची माहिती विनितने दिली आहे. केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन विनीतने यावेळी केली आहे. (हे वाचा- कोरोनाशी लढण्यासाठी मास्टर ब्लास्टरकडून 50 लाखांची मदत, सचिनचे इतरांना आवाहन) देशभरात अनेक उद्योजक, कलाकार पैशांची मदत करत आहेत. पण त्याचप्रमाणे अशाप्रकारे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणाऱ्या विनीतचे देशभरातून कौतुक होत आहे. संपादन- जान्हवी भाटकर