मुंबई, 07 ऑगस्ट**:** प्रो कबड्डीचा नववा सीझन यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. त्याआधी 5 आणि 6 ऑगस्टला मुंबईत खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडला. यावेळी 12 फ्रँचायझींकडून वेगवेगळ्या कॅटेगरीतील 130 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यात स्टार कबड्डीपटू पवन कुमार सेहरावत चांगलाच भाव खाऊन गेला. पवनला प्रो कबड्डीच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागली. तामिल थलाईवाज या संघानं तब्बल 2 कोटी 26 लाख रु. मोजून पवन कुमारला आपल्या संघात घेतलं. त्यापाठोपाठ विकास खंडोला 1 कोटी 70 मध्ये बंगळुरु बुल्सच्या ताफ्यात सामील झाला. पण या लिलावात ‘कोट्यधीश’ भारतीय खेळाडूंसह सर्वात जास्त चर्चा झाली ती इराणी खेळाडूंची. अत्राचली, नबीबक्ष पुणे संघात गेल्या काही मोसमात यू मुंबा संघाकडून खेळणाऱ्या लेफ्ट कॉर्नर स्पेशालिस्ट फझल अत्राचली या इराणच्या खेळाडूवर सगळ्यांचीच नजर होती. त्यामुळे प्रत्यक्ष लिलावात प्रत्येक फ्रँचायझीनं अत्राचलीवर बोली लावली. त्यामुळे त्याची किंमत वाढता वाढता कोटींच्या घरात गेली. अखेर पुणेरी पलटननं तब्बल 1 कोटी 38 लाखांमध्ये त्याला खरेदी केलं. 2018 च्या लिलावात यू मुंबानंही फझल अत्राचलीला 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. फझल अत्राचलीला विकत घेतल्यानंतर पुणेरी पलटननं आणखी एक महागडा डाव खेळला. तो म्हणजे इराणच्याच अष्टपैलू मोहम्मद इस्माईलवर नबीबक्षवर बोली लावून. पुण्याच्या फ्रँचायझीनं नबीबक्षवरही सर्वाधिक बोली लावताना 87 लाख रुपये खर्च केले. या लिलावात पुणेरी पलटनची झोळी चांगलीच खाली झाली असली तरी त्यांच्या संघात इराणचे दोन तगडे खेळाडू सामील झाले आहेत. त्यामुळे पुण्याची बाजूही भक्कम झाली आहे. अत्राचली आणि नबीबक्षपाठोपाठ डिफेंडर आमीर हुसेन बस्तमीलाही हरियाणा स्टीलर्सनं 65 लाखांची बोली लावून विकत घेतलं. हेही वाचा - CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण हॅटट्रिक; नीतू, अमितपाठोपाठ निखत झरीनला गोल्ड इराणी खेळाडूंना महत्व का**?** आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या क्रमवारीत अव्वल स्थानार असलेल्या भारतानंतर इराणचा क्रमांक लागतो. कबड्डी विश्वचषक, आशियाई कबड्डीत इराणनं लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे इराणी खेळाडूंना प्रो कबड्डीच्या लिलावात परदेशी खेळाडूंच्या यादीत जास्त महत्व होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.