मुंबई, 19 मे : केकेआरचा पराभव करून लखनऊ सुपर जाएंट्स (KKR vs LSG) आयपीएलच्या (IPL 2022) प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात लखनऊने केकेआरचा 2 रनने पराभव केला. या सामन्यात लखनऊने पहिले बॅटिंग करत 210 रन केल्या होत्या. ओपनर क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) वादळी शतक केलं, तर कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) त्याला चांगली साथ दिली. डिकॉकने 200 च्या स्ट्राईक रेटने 70 बॉलमध्ये नाबाद 140 रनची आक्रमक खेळी केली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 20 ओव्हरमध्ये एकही विकेट गमावली नाही.
क्विंटन डिकॉकच्या धमाकेदार खेळीची जोरदार चर्चा होत आहे, पण डिकॉकचं कौतुक केल्यामुळे त्याचा लखनऊ टीममधला सहकारी कृणाल पांड्या (Krunal Pandya) वादात सापडला आहे.
दुखापतीमुळे कृणाल पांड्या केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये खेळू शकला नाही, पण मैदानाबाहेरून तो टीमचा उत्साह वाढवत होता. डिकॉकने शतक पूर्ण केल्यानंतर कृणालने त्याचं अभिनंदन करण्यासाठी ट्वीट केलं, पण या ट्वीटनंतर कृणाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. कृणाल पांड्याने रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी ट्वीट केलं, ज्यावेळी मॅच सुरू होती.
मॅच सुरू असताना कृणालने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. मॅच सुरू असताना कृणाल फोनचा वापर कसा करू शकतो? असं एकाने विचारलं. तर दुसऱ्याने कृणाल टीमचा भाग आहे, मग नियम बदलण्यात आले का? असं विचारलं.
स्टेडियममध्ये आल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना मोबाईल फोन आणि संवादाची अन्य उपकरणं काढून घेतली जातात आणि मॅच संपल्यानंतर त्यांना ही परत दिली जातात. आयसीसीच्या नियमांनुसार इंटरनेटशी जोडली गेलेली उपकरणं स्वत: जवळ ठेवायला परवानगी नसते. क्रिकेटमध्ये फिक्सिंगची प्रकरणं वाढू लागल्यानंतर हा नियम करण्यात आला.
आयसीसीच्या या नियमामुळेच पांड्याने ट्वीट कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला गेला, पण बहुतेक खेळाडूंचं सोशल मीडिया अकाऊंट त्यांची सोशल मीडिया टीम हाताळते, त्यामुळे कृणाल पांड्याच्या अकाऊंटवरून त्याच्या टीमनेच हे ट्वीट केल्याची शक्यता आहे.
लखनऊ आणि केकेआर यांची मॅच सुरू असतानाही कृणाल डग आऊटमध्ये दिसला नाही. दुखापतीमुळे तो हॉटेलच्या रूममध्ये आराम करत असेल, तिकडूनच त्याने डिकॉकला शुभेच्छा देणारं ट्वीट केलं असेल, असंही बोललं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, KKR, Krunal Pandya, Lucknow Super Giants, Quinton de kock