नवी दिल्ली, 22 मार्च: आयपीएलला (IPL2022) केवळ 4 दिवस उरले आहेत. 26 मार्चपासून सुरु होणाऱ्या या आयपीएल सामन्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि केकेआर (KKR) यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमधील 8 संघांची संख्या 10 वर गेली आहे. या 10 संघांमध्ये साखळी सामन्यात एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने मुंबईच्या 3 आणि पुण्यातील एका स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे यावर्षी आयपीएल संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. मात्र, असे असले, तरीही मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडिअमवर काही सामने खेळायला मिळणार आहेत. प्ले-ऑफच्या ४ सामन्यांचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. क्रिकबजच्या म्हणण्यानुसार, स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर चाहत्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अद्याप महाराष्ट्र सरकारकडून 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्पर्धा पुढे जाईल, तेव्हा प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होईल. देशातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, अधिक संख्येने प्रेक्षक स्टेडिअममध्ये येऊ शकतील. वानखेडे स्टेडिअमच्या सध्याच्या नियमानुसार 9800 ते 10 हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये येऊ शकतील.मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये 7 ते 9 हजार प्रेक्षक, तर मुंबईच्याच डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये 11-12 हजार आणि पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये 12 हजार प्रेक्षक येऊ शकतील. अशाप्रकारे डी. वाय. पाटील आणि एमसीए स्टेडिअममध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक हजेरी लावतील. यादरम्यानच बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडून सर्व राज्य असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअममध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.