मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सने केकेआरचा (KKR vs Delhi Capitals) 44 रनने पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा 19.4 ओव्हरमध्ये 171 रनवर आऊट झाला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 35 रन देत 4 विकेट घेतल्या, त्याने श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, सुनिल नारायण आणि उमेश यादवची विकेट घेतली. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत कुलदीप यादव केकेआरच्या टीममध्ये होता, पण त्याला इयन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकात्याने मैदानातच उतरवलं नाही. केकेआरच्या या निर्णयाबाबत कुलदीपने अनेकवेळा उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. आयपीएल लिलावाआधी केकेआरने कुलदीप यादवला रिलीज केलं. लिलावामध्ये दिल्लीने कुलदीपला 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. कुलदीप यादवने केकेआरने केलेल्या या अपमानाचा बदला घेतला. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यानेही यावरून केकेआरवर निशाणा साधला आहे. जाफरने एक मीम शेयर केलं आहे. ‘मुझे छोड़कर जो तुम जाआगे, बड़ा पछताओगे’, असं कॅप्शन देत जाफरने विकी कौशलचा फोटो शेयर केला आहे.
.@imkuldeep18 to KKR this game: #KKRvDC #IPL2022 pic.twitter.com/CqfPIhAsF0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 10, 2022
आयपीएलच्या या मोसमात कुलदीप यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये कुलदीप उमेश यादवसोबत पहिल्या क्रमांकावर आहे. कुलदीपने 4 सामन्यांमध्ये 7.40 चा इकोनॉमी रेट आणि 11.60 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या आहेत. दिल्लीविरुद्ध पराभव झाला असला तरी केकेआरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. केकेआरने 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकात्याच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे दिल्ली 4 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि 2 मध्ये त्यांचा पराभव झाला.