मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL Eliminator) आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) पराभव केला. याचसोबत लखनऊचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आरसीबीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 193/6 पर्यंत मजल मारता आली, त्यामुळे त्यांचा 14 रननी पराभव झाला. केएल राहुल (KL Rahul) लखनऊचा सर्वाधिक रन स्कोअर करणारा खेळाडू असला तरी आता त्याच्यावरच टीमच्या पराभवाचं खापर फुटत आहे.
एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने एकट्यानेच 10 ओव्हर खेळल्या. 58 बॉलमध्ये राहुलने 79 रनची खेळी केली, यात 3 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. राहुलने 136.21 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या बॅटिंगवर निशाणा साधण्यात येत आहे. राहुलने त्याचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 बॉल खेळले.
आयपीएलच्या मागच्या काही मोसमांपासून केएल राहुलच्या स्ट्राईक रेटवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. आयपीएलच्या या मोसमात राहुलने 15 मॅचमध्ये 51.33 ची सरासरी आणि 135.38 च्या स्ट्राईक रेटने 616 रन केले. तर याआधीच्या दोन आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार असताना राहुलने 129.34 आणि 138.80 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
केएल राहुलने 2018 ते 2022 ही सलग पाच वर्ष प्रत्येक सिझनमध्ये 590 पेक्षा जास्त रन काढले आहेत. राहुलनं 2018 साली 659 रन केले होते. 2019 साली 593, 2020 साली 670 आणि 2021 साली 626 रन केले. राहुल 2018 ते 2021 या कालावधीमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. या काळातील प्रत्येक वर्षी राहुलनं पंजाबकडून सर्वात जास्त रन केले. पण, तो पंजाबला एकदाही 'प्ले ऑफ' मध्ये नेऊ शकला नाही, त्यामुळे प्रत्येक मोसमात 600 रन करूनही टीम आयपीएल जिंकत नसेल तर फायदा काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मांजरेकरांचा निशाणा
इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही राहुलच्या स्ट्राईक रेटवर आक्षेप घेतले. 'पंजाब किंग्सकडून खेळतानाही राहुल अशीच बॅटिंग करायचा. जलद खेळण्याऐवजी तो क्रीजवर जास्त काळ टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. तुझ्याकडून मॅच जिंकवण्याची अपेक्षा नाही, तू खुलून खेळ, असं मी कोच असतो तर राहुलला सांगितलं असतं. जर राहुलने अशी बॅटिंग केली तर निर्णय टीमच्या बाजूने लागतील. याच कारणामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला स्ट्राईक रेट आयपीएलपेक्षा चांगला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा सोबत असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक बॅट्समन म्हणून खेळतो, तेव्हा त्याचा विचार मैदानात जाऊन बॅटिंग करणं हाच असतो,' असं मांजरेकर म्हणाले.
'केएल राहुलने क्रीजवर टिकून राहून खेळण्याऐवजी जलद रन करणं गरजेचं आहे. राहुल खुलून बॅटिंग करतो तेव्हा त्याचा फायदा टीमला होतो, हे आपण आधीही पाहिलं आहे,' असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं.
शास्त्रींचाही आक्षेप
दुसरीकडे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही केएल राहुलच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'केएल राहुल आरसीबीविरुद्ध आणखी संधी घेऊ शकला असता, कारण हुड्डा दुसऱ्या बाजूने मोठे शॉट मारत होता. 9 ते 13 ओव्हरमध्ये राहुल आक्रमक बॅटिंग करू शकला असता. लखनऊने आरसीबीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं असतं, तर आरसीबीवर दबाव असता,' असं रवी शास्त्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants