मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens Asia Cup: आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा, हरमनप्रीतच्या टीम इंडियानं केला हा 'भीमपराक्रम'

Womens Asia Cup: आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा, हरमनप्रीतच्या टीम इंडियानं केला हा 'भीमपराक्रम'

भारतानं सातव्यांदा पटकावला आशिया कप

भारतानं सातव्यांदा पटकावला आशिया कप

Womens Asia Cup: आशिया कपची फायनल जिंकून हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं सातव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. महत्वाचं म्हणजे फायनलमध्ये भारतीय संघानं श्रीलंकेवर एकतर्फी वर्चस्व गाजवलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सिल्हेट-बांगलादेश, 15 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कपमध्ये हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं मोठा पराक्रम गाजवला. भारतीय संघानं या सामन्यात श्रीलंकेचा 8 विकेट्सनी पराभव करुन एकतर्फी वर्चस्व गाजवलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेनं घेतलेला बॅटिंग करण्याचा निर्णय भारताच्या पथ्थ्यावर पडला. कारण भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करताना श्रीलंकेला अवघ्या 65 धावात रोखलं. त्यानंतर स्मृती मानधनाचा नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 66 धावांचं सोपं आव्हान भारतीय संघानं आरामात पार केलं आणि आशिया चषकाच्या इतिहासात सातव्यांदा विजेतेपद पटकावलं.

रेणुका सिंगचं भेदक आक्रमण

अंतिम फेरीच्या या निर्णायक सामन्यात श्रीलंकेची कॅप्टन चमारी अटापटू आणि विकेट किपर बॅट्समन संजीवनी ही सलामीची जोडी रन आऊट झाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगनं आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची मधली फळी कापून काढली. तिनं 3 ओव्हरमध्ये एका मेडन ओव्हरसह केवळ 5 धावा देताना 3 विकेट्स काढल्या. त्यानंतर राजेश्वरी गायकवाड (2/16) आणि स्नेह राणानं (2/13) तिला सुरेख साथ दिली. ऑफ स्पिनर दिप्ती शर्माला विकेट मिळाली नसली तरी तिनं आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त सात धावा दिल्या. भारतीय गोलंदाजांच्या याच कामगिरीमुळे श्रीलंकेला 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 65 धावाच करता आल्या.

त्यानंतर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (5) या जोडीनं 32 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेली जेमिमा रॉड्रिग्स (2) लवकर बाद झाली. मग स्मृती  (ना.51) आणि कॅप्टन हरमननं (11) विजयी लक्ष्य 8.3 ओव्हर्समध्ये पार केलं.

टीम इंडियाचा आशिया कपमध्ये दबदबा

2004 पासून आतापर्यंत आशिया कपमध्ये प्रत्येकवेळी भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या 8 पैकी आठही स्पर्धांमध्ये भारतीय संघानं फायनल गाठली होती. पण 2018 सालचा अपवाद वगळता भारतीय संघानं उर्वरित सातही स्पर्धांमध्ये आशिया कपवर आपलं नाव कोरलं. 2018 मध्ये बांगलादेशकडून भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण यंदाच्या स्पर्धेत 8 पैकी 7 सामने जिंकून पुन्हा एकदा आशिया कप आपल्या नावावर केला.

आशिया चषक फायनल्सचे निकाल

2004 - भारताचा श्रीलंकेवर 5-0 असा विजय  (दोनच संघ असल्यानं 5 सामन्यांची मालिका)

2005 - भारताचा श्रीलंकेवर 97 धावांनी विजय

2006 - भारताचा श्रीलंकेवर 8 विकेट्सनी विजय

2008 - भारताचा श्रीलंकेवर 108 धावांनी विजय

2012 - भारताचा पाकिस्तानवर 18 धावांनी विजय

2016 - भारताचा पाकिस्तानवर 17 धावांनी विजय

2018 - बांगलादेशचा भारतावर 3 विकेट्सनी विजय

2022 -भारताचा श्रीलंकेवर 8 विकेट्सनी विजय

हेही वाचा - T20 World Cup: वर्ल्ड कपच्या मैदानात हिटमॅनचा 'शो', मोडणार धोनीचा 6 वर्षांपूर्वीचा 'तो' रेकॉर्ड

श्रीलंका पुन्हा अपयशी

दरम्यान आशिया कपमध्ये श्रीलंकन महिला संघ पुन्हा अपयशी ठरला. कारण स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात श्रीलंकेनं आजवर पाच वेळा स्पर्धेची फायनल गाठली होती. पण पाचही वेळा श्रीलंकन संघाला भारताकडूनच पराभव स्वीकारावा लागला. यंदा तब्बल 14 वर्षांनी श्रीलंकेनं आशिया कपची फायनल गाठली होती. पण यंदाही त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Sports, Team india, Women's cricket Asia Cup