मुंबई, 3 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेटपटूंनसोबत पैशांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशातच आता भारताचा स्टार क्रिकेटर दीपक चहर याची पत्नी जया हिला एकाने लाखोंचा चुना लावला आहे. तसेच याप्रकरणी जाब विचारताच चहरच्या पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
दीपक चहर यांचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोबर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. या करारानुसार, 7 ऑक्टोबर 2022 रोजी जयाकडून 10 लाख रुपये घेतले होते. परंतु अद्याप ते परत दिले नाहीत. पैशाच्या मागणीसाठी गेलेल्या जयाला संबंधित व्यक्तींकडून शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा : शाहीन होणार आफ्रिदीचा जावई! कराचीत होणार लग्न सोहळा
दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांच्याकडून उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पारीख स्पोर्ट्सने जयाकडून करारासाठी 10 लाख रुपये घेतले होते, जे त्याने परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारताचा क्रिकेटपटू दीपक चहर याने जून 2022 मध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले. मागच्याच वर्षी त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळात असताना सामना जिंकल्यावर जया हिला लग्नासाठी प्रपोज केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Csk, IPL 2023, Team india