नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलीट्सनी दमदार कामगिरी बजावली. याच स्पर्धेत यंदा भारताचा महिला क्रिकेट संघही सहभागी झाला होता. 1998 नंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं रौप्यपदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात अवघ्या 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि भारताचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं.
कर्णधार हरमनप्रीत कौरची हीच रौप्यविजेती टीम गेल्या आठवड्यात भारतात परतली. भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदकविजेत्या खेळाडूंची नुकतीच भेट घेतली. या भेटीवेळी हरमनप्रीत भावूक झाली होती.
“पंतप्रधानांची भेट आमच्यासाठी खास”
“देशाच्या पंतप्रधानांकडून प्रेरणा मिळणं हे खूप खास आहे. जेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याशी बोलतात तेव्हा असं वाटतं की संपूर्ण देश आम्हाला पाठिंबा देत आहे, प्रत्येकजण आमच्या प्रयत्नांचं कौतुक करत आहे. आमच्या क्रिकेट टीमसाठी ही एक मोठी गोष्ट आहे.” पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर हरमनप्रीत कौरनं ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - IND vs ZIM: टीम इंडिया पोहोचली झिम्बाब्वेत, पाहा कसा असेल भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा?
फायनलनंतर मोदींनी केलं होतं कौतुक
दरम्यान 8 ऑगस्टला भारताच्या रुपेरी यशानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत भारतीय संघाचं कौतुक केलं होतं. “क्रिकेट हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महिला क्रिकेट संघानं राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ केला आणि रौप्यपदक पटकावलं. भारताचं राष्ट्रकुल क्रिकेटमधलं हे पहिलं पदक असल्यानं ते खास आहे. सर्वांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा.” या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला साखळी सामन्यात आणि फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. पण पाकिस्तान, बार्बाडोस आणि इंग्लंडसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर हरमनच्या वुमन ब्रिगेडनं वर्चस्व गाजवलं होतं.
Cricket and India are inseparable. Our Women's cricket team played excellent cricket through the CWG and they bring home the prestigious Silver medal. Being the first ever CWG medal in cricket, this one will always be special. Best wishes to all team members for a bright future. pic.twitter.com/jTeJb9I9XB
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2022
बर्मिंगहॅममध्ये भारताला 61 पदकं
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं पदकांची घसघशीत कमाई केली. राष्ट्रकुलच्या इतिहासात सर्वाधिक पदकं मिळवून देणाऱ्या नेमबाजीचा यंदा समावेश नसतानाही भारतीय खेळाडूंनी 61 पदकं मिळवून दिली. त्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी सोनेरी यशाला गवसणी घातली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pm modi, T20 cricket, Team india