मुंबई, 11 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मंगळवार 10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी तर विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी भारतासाठी विजयाचे कारण ठरली. उद्या 12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डनन्स स्टेडियमवर श्रीलंके विरुद्ध दुसरा वन डे सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात देखील भारताचे दिग्गज खेळाडू हे श्रीलंकेच्या गोलंदाजांसाठी घातक ठरू शकतात. तर चांगल्या फॉर्मात असणारा रोहित शर्मा ईडन गार्डन्सवर स्वतःचाच रेकॉर्ड मोडू शकतो. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे शतक अवघ्या 17 धावांनी राहिले. रोहितने या सामन्यात 83 धावांची खेळी केली. कोलकाताचे ईडन गार्डन्स स्टेडियम खेळाडूंचे आवडते ठिकाण आहे. रोहितने या मैदानावर त्याची सर्वोच्च धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड केला होता. 2017 मध्ये त्याने याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. रोहितला पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करून स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. मात्र हा रेकॉर्ड तोडणं त्याच्यासाठी त्याला अधिकवेळ मैदानात टिकून रहावे लागेल. हे ही वाचा : पृथ्वी शॉचं तिहेरी शतक, पण अजूनही मोडू शकला नाही निंबाळकरांचा 74 वर्षे जुना रेकॉर्ड भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना ईडन गार्डन्स स्टेडियमसाठी देखील खास ठरणार आहे. कारण या स्टेडियमवर गेल्या पाच वर्षांपासून ईडन एकही वनडे सामना खेळला गेला नाही. या स्टेडियमवर 21 सप्टेंबर 2017 रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सामना 50 धावांनी जिंकला होता. बऱ्याच कालावधीनंतर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना होणार असल्याने या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाखच भरेल अशी अपेक्षा बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकूण 21 वन डे सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने भारताने जिंकले असून 8 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. याच स्टेडियमवर भारताने वनडेमध्ये सर्वाधिक 404 धावा केल्या आहेत. एकूणच या मैदानावर भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.