नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 (T20) सामन्यातही टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) 73 रनने दणदणीत विजय झाला आहे, याचसह भारताने 3 टी-20 मॅचची सीरिज 3-0 ने जिंकत न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं आहे. या सिरीजनंतर कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) आर अश्विनचे(R Ashwin) कोडकौतुक गायले. या महिन्याच्या सुरुवातीला T20 वर्ल्ड कप स्पर्धेत चार वर्षांनी मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करणाऱ्या 35 वर्षीय अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्याबरोबरच त्याने विकेट्सही घेतल्या.
तिसऱ्या T20 सामन्यात 73 धावांनी विजय मिळविल्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तो अश्विनसंदर्भात बोलत होता. तो म्हणाला, तो कोणत्याही कर्णधारासाठी नेहमीच आक्रमक पर्याय असतो. जेव्हा तुमच्या संघात त्याच्यासारखा गोलंदाज असतो तेव्हा तुम्हाला मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याची संधी मिळते आणि हा टप्पा किती महत्त्वाचा आहे. हे आम्हाला माहीत आहे. त्याने अप्रतिम पुनरागमन केले आहे. तो एक महान गोलंदाज आहे आणि हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.
तसेच, गेल्या काही वर्षांत त्याने कसोटी सामन्यांमध्ये आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे, त्याचा विक्रम वाईट नाही. दुबईत आणि इथे दोन सामन्यांमध्ये त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते त्याची क्षमता दर्शवते.
तुम्हाला माहीत आहे की मधल्या ओव्हरमध्ये तुम्हाला रन रेटवर नियंत्रण ठेवण्याची आणि विकेट्स मिळवण्याची गरज आहे आणि अश्विनने अक्षरासह आमच्यासाठी ते केले. हे दोन्ही पर्याय मधल्या षटकांमध्ये विकेट्स मिळवण्यासाठी आहेत. त्यामुळे कर्णधारासाठी, त्याच्यासारख्या गोलंदाजांची उपस्थिती चांगले पर्याय उपलब्ध करून देते. असे उद्गार रोहितने यावेळी काढले.
रोहितच्या या वक्तव्यावरुन क्रिकेट जगतात T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये अश्विनचे स्थान पक्के मानले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India team selection, R ashwin, Rohit sharma, T20 league, T20 world cup, Team india