इंदूर, 14 नोव्हेंबर : बांगलादेश विरोधात टी-20 मालिका 2-1नं खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आता कसोटीमध्येही क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज आहे. भारत-बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून इंदूरमध्ये सुरू होणार आहे. पहिला सामना इंदूरमधील होळकर मैदानात होणार आहे. मुख्य म्हणजे या मैदानात नेहमीच टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. भारतीय संघानं इंदूरमधील या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सर्व सामने जिंकले आहेत. 2006पासून आतापर्यंत या मैदानावर एक कसोटी, एक टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघानं विजयी कामगिरी केली आहे. भारत-बांगलादेश यांच्यात 14-18 दरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे. तर, दुसरा सामना डे-नाइट खेळवला जाणार आहे. वाचा- टीम इंडियाचे ‘गुलाबी’ दिवस! खेळाडूंनी त्याच्यासोबत केला सराव, पाहा VIDEO याआधी याच मैदानावर 2016मध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारतानं तब्बल 321 धावांनी विजय मिळवला होता. विराट आणि अजिंक्य रहाणेसाठीही हे मैदान खास आहे. या मैदानावर खेळवण्यात आलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात कोहलीनं 211 तर रहाणेनं 188 धावांची तुफानी खेळी केली होती. कोहली करणार ‘विराट’ रेकॉर्ड विराट कोहली हा असा फलंदाज आहे जो मैदानात उतरताच कोणता ना कोणता विक्रम करतोच. इंदूरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यातही विराटकडे अशी संधी आहे. या कसोटी सामन्यात विराटनं पहिल्या डावात 32 धावा केल्या, कसोटीमध्ये त्याच्या 5 हजार धावा होतील. अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय कर्णधार आहे. याआधी एवढ्या जलद गतीनं कोणत्याच कर्णधारानं 5 हजार धावा केलेल्या नाहीत. वाचा- क्रिकेटमध्ये पुन्हा झाली छेडछाड, ICCनं क्रिकेटपटूवर केली बॅनची कारवाई रोहित शर्मानं याच मैदानात केली होती वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी या मैदानावर रोहित शर्मानेही चांगली कामगिरी केली आहे. या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात शर्मानं एका डावात 51 धावा केल्या होत्या. तर, 2017मध्ये खेळलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतकी खेळी केली होती. रोहितनं 35 चेंडूत श्रीलंकाविरोधात ही कामगिरी केली होती. रोहितचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा दक्षिण आफ्रिका विरोधात सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्मानं विक्रमी कामगिरी केली होती. सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्यांदाच रोहित खेळला होता. पहिल्या कसोटी सामन्यात रोहितनं 176 आणि 127 अशी शतकी खेळी केली होती. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळं रोहित आणि मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी फायद्याची ठरणार आहे. वाचा- IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार ‘या’ चॅम्पियन खेळाडूची साथ! असा आहे भारताचा कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋध्दीमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील, ऋषभ पंत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







