मुंबई, 26 सप्टेंबर: टीम इंडियानं हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टी20 मालिकाविजय साजरा केला. टीम इंडियासाठी ही मालिका खास ठरली. कारण मोहालीतला पहिला सामना हरल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक करत नागपूर आणि हैदराबादमध्ये बाजी मारली. भारतानं गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला मायदेशातल्या टी20 मालिकेत हरवण्याचा पराक्रम गाजवला. तिसऱ्या टी20त सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दिलेलं 187 रन्सचं लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स राखून पार केलं. आणि याच विजयानंतर टीम इंडियाचं आयसीसी रॅन्किंगमधलं अव्वल स्थान आणखी मजबूत झालं आहे. टीम इंडिया मजबूत स्थितीत भारतीय संघ आयसीसीच्या टी20 रॅन्किंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या खात्यात एका रेटिंग पॉईंटनं वाढ झाली आहे. भारताच्या खात्यात सध्या 268 रेटिंग पॉईंट आहेत. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा भारत तब्बल 7 पॉईंट्सनी पुढे आहे. इंग्लंडच्या खात्यात एकूण 261 रेटिंग पॉईंट आहेत. एकूणच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकाविजयानं भारताचं टी20 रँकिंगमधलं स्थान चांगलच मजबूत झालं आहे.
M. O. O. D as #TeamIndia beat Australia in the third #INDvAUS T20I & seal the series win. 👍 👍
— BCCI (@BCCI) September 25, 2022
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV pic.twitter.com/uYBXd5GhXm
पाकिस्तानच्या विजयानं टीम इंडियाला फायदा सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघांमध्ये सात टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चारपैकी दोन सामन्यात इंग्लंडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. याचाच फायदा भारताला झाला. रॅन्किंगमध्ये पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहे. हेही वाचा - Ind vs Aus: वर्ल्ड चॅम्पियन्सना हरवलं, पण तरीही वर्ल्ड कपआधी रोहित शर्मासमोर आहेत हे प्रश्न… वर्ल्ड चॅम्पियन्सची घसरगुंडी दरम्यानं भारताविरुद्धच्या पराभवामुळे टी20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला रॅन्किंगमध्ये नुकसान सहन करावं लागलं आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा एक रेटिंग पॉईंट कमी झाला आहे. त्यामुळे 250 गुणांसह ते सध्या सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. आगामी टी20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघांविरुद्धही टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपचं बिगुल वाजणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाची सलामी 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ICC टी20 रॅन्किंगमधले टॉप 10 संघ
- भारत - 268
- इंग्लंड - 261
- दक्षिण आफ्रिका - 258
- पाकिस्तान- 258
- न्यूझीलंड - 252
- ऑस्ट्रेलिया - 250
- वेस्ट इंडिज - 241
- श्रीलंका - 237
- बांगलादेश - 224
- अफगाणिस्तान - 219