सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीनं टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून दिली. पण या मालिकेनंतरही आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी कॅप्टन रोहित शर्माची तिंचा वाढवणाऱ्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकाविजयात सगळं क्रेडिट द्यावं लागेल ते भारतीय बॅट्समनना. कारण टीम इंडियाचं बॉलिंग डिपार्टमेंट तिन्ही सामन्यात फेल ठरलं. भुवनेश्वर कुमारनं दोन मॅचमध्ये धावांची टाकसाळ ऑस्ट्रेलियाला उघडून दिली. तर हैदराबादच्या अखेरच्या सामन्यात बुमरानं तर 50 रन्स मोजले. त्यामुळे वर्ल्ड कपआधी भारतीय बॉलिंग अटॅक मजबूत करणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
डेथ ओव्हर्समध्ये दबावात भारतीय बॉलिंग निष्प्रभ ठरताना दिसतेय. आशिया कपपासून अनेक सामन्यात असं चित्र दिसलं. त्यामुळे हाताशी आलेले अनेक सामने भारतीय संघानं गमावले आहेत.
गेल्या काही सामन्यात भारतीय फिल्डिंगमध्येही ढिसाळपणा दिसला. मोक्याच्या क्षणी सुटलेल्या कॅचेसमुळे भारतावर सामना गमावण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत राहुल, अक्षर पटेलनं कॅच सोडल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या काही सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुलकडून मोठी सलामी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीत 21 तर हैदराबादमध्ये या जोडीनं 5 धावांची सलामी दिली.
लेग स्पिनर युजवेंद्र चहलकडून मधल्या ओव्हर्समध्ये टीम इंडियाला विकेटसची अपेक्षा आहे. पण गेल्या काही सामन्यात चहल टीम इंडियासाठी महागडा गोलंदाज ठरतोय.