कोलकाता, 15 फेब्रुवारी : टीम इंडिया (Team India) वनडे सीरिजनंतर आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सीरिज खेळणार आहे. ती टी-20 मॅचच्या या सीरिजची सुरुवात (India vs West Indies T20) 16 फेब्रुवारीपासून कोलकात्याच्या इडन गार्डनवर होणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने खेळाडूंची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आयपीएल लिलाव (IPL 2022 Mega Auction) आता झाला आहे, त्यामुळे ते सगळं विसरून देशासाठी खेळण्यावर लक्ष द्या, अशा स्पष्ट शब्दांमध्ये रोहितने टीमच्या खेळाडूंना खडसावलं आहे. टी-20 सीरिजआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितला आयपीएल लिलावाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना टीम इंडियाच फोकस टी-20 सीरिजवर आहे आणि खेळाडूंनाही याच सीरिजवर लक्ष द्यायला सांगण्यात आलं आहे, असं उत्तर रोहितने दिलं. आयपीएल लिलावानंतर टीम मीटिंग झाली, यामध्ये खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आलं, की पुढचे दोन आठवडे लिलावात काय झालं ते विसरून जा आणि देशासाठी खेळण्याकडे लक्ष द्या, कारण वेस्ट इंडिजनंतर श्रीलंकेविरुद्धही टी-20 सीरिज होणार आहे, असं रोहित म्हणाला. ‘लिलावामध्ये खेळाडूंच्या भावना जोडल्या गेल्या असतात हे समजू शकतो. आपण कोणत्या टीमकडून खेळणार, याची उत्सुकता खेळाडूंना असणं स्वाभाविक आहे, पण आता या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आम्ही टीम मीटिंग घेतली आणि सांगितलं जे लिलावात व्हायचंय ते झालं. आता भारताकडून खेळण्यासाठी पूर्ण उर्जा लावा,’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. ‘आयपीएलवर इकडे कोणताही विचार करण्यात येत नाहीये. आयपीएलमध्ये खेळाडू कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करू दे, पण टीम इंडियासाठी जे योग्य आहे ते करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत,’ असं वक्तव्य रोहितने केलं. आयपीएलच्या लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. विकेट कीपर इशान किशनला मुंबई इंडियन्सनी 15.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. दीपक चहरसाठी चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटी रुपये खर्च केले. याशिवाय आवेश खान 10 कोटी रुपयांसह आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा अनकॅप खेळाडू ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.