नवी दिल्ली, 8 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs South Africa T20 Series) डबल धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दुखापतीमुळे या सीरिजमधून बाहेर झाले आहेत. केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे, तर काल संध्याकाळी नेटमध्ये बॅटिंग करत असताना कुलदीप यादवच्या उजव्या हाताला बॉल लागला. केएल राहुलच्या गैरहजेरीत ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या सीरिजसाठी उपकर्णधार असेल. उद्या म्हणजेच गुरूवार 9 जूनपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे.
केएल राहुल आणि कुलदीप यादव यांच्या बदली खेळाडूची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. हे दोन्ही क्रिकेटपटू आता एनसीएमध्ये जाणार आहेत. तिकडेच त्यांच्या दुखापतीवर उपचार केले जातील, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
केएल राहुलने त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2022 मध्ये लखनऊला प्ले-ऑफमध्ये नेलं होतं. राहुल लखनऊचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 15 सामन्यांमध्ये 51.33 च्या सरासरीने राहुलने 616 रन केले, यात दोन शतकांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण काही वेळा त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
केएल राहुलप्रमाणेच कुलदीप यादवही आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. कुलदीपने 14 सामन्यांमध्ये 19.95 च्या सरासरीने आणि 8.43 च्या इकोनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या. आयपीएलच्या या मोसमात कुलदीप दिल्ली कॅपिटल्सचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता.
भारतीय टीम
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.