कोलकाता, 21 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) तब्बल 73 रनने विजय झाला. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे, याचसह भारताने ही सीरिजही 3-0 ने जिंकली आहे. तसंच भारताने न्यूझीलंडला लागोपाठ दुसऱ्यांदा व्हाईट वॉश केलं आहे. याआधी 2020 साली झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही भारताने टी-20 सीरिजमध्ये किवी टीमला 5-0 ने धूळ चारली होती. भारताने दिलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 111 रनवर ऑल आऊट झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या जोडीची ही पहिलीच सीरिज होती. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहलीने (Virat Kohli) या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली होती, तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपला होता. विराटनंतर रोहित शर्माकडे टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी देण्यात आली, तर राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला. टी-20 वर्ल्ड कपमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाला नव्याने सुरुवात करावी लागणार होती. ही सुरुवात रोहित आणि द्रविडच्या जोडीने धडाक्यात केली. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली असली तरी राहुल द्रविडने मात्र मॅच संपायच्या काही वेळातच टीमच्या खेळाडूंना जमिनीवर आणलं. ‘सीरिज विजय चांगला झाला, प्रत्येक जण चांगला खेळला. सुरुवात चांगली झाल्याचा आनंद आहे, पण आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. न्यूझीलंडसाठी गोष्टी कठीण होत्या, कारण वर्ल्ड कप फायनल खेळल्यानंतर तीनच दिवसात त्यांचे खेळाडू भारतात आले आणि पुढच्या 6 दिवसात 3 मॅच खेळले. या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत,’ असं द्रविड म्हणाला. ‘या विजयातून आम्हाला शिकण्यासारखं आहे, पुढच्या 10 महिन्यांचा प्रवास मोठा आहे, या काळात काही उच्चांकी आणि निच्चांकी क्षणही येतील. युवा खेळाडू पुढे आले, याचा आनंद आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये खेळले नसलेल्या खेळाडूंना संधी दिली. या खेळाडूंचं कौशल्य आम्हाला कळालं, पुढे जाताना या सगळ्याची बांधणी करावी लागणार आहे,’ असं द्रविडने सांगितलं. ‘काही खेळाडू विश्रांतीनंतर टीममध्ये परत येतील, तेव्हा आमची टीम आणखी मजबूत होईल, पण पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. पुढच्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंतचा मोसम खूप मोठा आहे, त्यामुळे खेळाडूंना योग्य विश्रांती मिळाली पाहिजे,’ असं वक्तव्य द्रविडने केलं. ‘या टीममधले तीन-चार खेळाडूच टेस्ट मॅचसाठी जाणार आहेत, त्यामुळे या खेळाडूंनी लवकर झोपावं, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांना सकाळी 7.30 वाजता उठायचं आहे, मॅच 9.30 वाजता सुरू होणार आहे. त्यांची रात्रीची झोप चांगली झाली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. इतर खेळाडू मात्र रात्री एन्जॉय करू शकतात,’ असं राहुल द्रविड म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







