मुंबईत,६ जानेवारी : सध्या भारतीय संघ श्रीलंके विरुद्ध तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकला असून काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव करून 1-1 अशी बरोबरी साधली. श्रीलंकेसोबत मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड सोबत तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र 18 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारताचे दोन दिग्गज खेळाडूंना बीसीसीआय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघाचा भाग असणार नाहीत. 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. हे ही वाचा : विराट, रोहितने नाही दिली संधी; धोनीच्या फेवरेट प्लेअरने केली कमाल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत रोहित आणि विराट या दोघांना संधी देण्यात येणार नाही. यादोघांना संघाबाहेर करण्यात बीसीसीआयचा कोणताही वावगा उद्देश नाही, परंतु भविष्यात एक चांगला संघ तयार करण्याच्या उद्देशाने हे करणे आवश्यक वाटते”. रोहित आणि विराट सह भुवनेश्वर कुमार, आर अश्विन आणि मोहम्मद शमी याना देखील न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने देखील याबाबत संकेत दिले आहेत. सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, “जर आपण T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीनंतर पाहिलं तर फक्त तीन-चार खेळाडू आहेत ज्यांनी तो सामना इंग्लंडविरुद्ध खेळला आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. पुढच्या टी-20 हंगामाबाबत आमचा विचार वेगळा आहे. श्रीलंकेसारख्या संघासोबत खेळणे हा युवा संघासाठी चांगला अनुभव आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता जास्त लक्ष आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. त्यामुळे टी-20 मध्ये युवा खेळाडूंना आजमावण्याची संधी आहे”. युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा उद्देश असला तरी देखील विराट आणि रोहितचे चाहते यामुळे नाराज होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.