ढाका, 09 डिसेंबर : बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर आता तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात अचानक बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासह तीन भारतीय खेळाडुंना दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज कुलदीप सेन हासुद्धा पाठदुखीमुळे तिसऱ्या सामन्यात खेळू शखणार नाही. यामुळे आता भारताच्या निवड समितीने कुलदीप यादवला संधी दिली आहे.
रोहित शर्माला झालेल्या दुखापतीनंतर वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली. ढाक्यातील एका स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅन करण्यात आले. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर रोहित शर्मा मुंबईला परतला असून तो तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. आता तो कसोटीत खेळणार की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.
हेही वाचा : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, रोहितसह 3 खेळाडू आऊट
वेगवान गोलंदाज कुलदीप सेन यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केल्यानतंर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावं लागलंय.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी केएल राहुलकडे कर्णधार पद सोपवण्यात आलं आहे. याशिवाय संघात रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, शाहबाझ अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आलाय.
कुलदीप सेनशिवाय दीपक चाहरसुद्धा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी हॅमस्ट्रिंगमध्ये तणावामुळे मालिकेतून बाहेर पडला. कुलदीप आणि दीपक चाहर दोघेही आता त्यांच्या दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी एनसीएमध्ये दाखल होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rohit sharma