मीरपूर, 4 डिसेंबर : यजमान बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाचा एका विकेटने पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. तर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय संघाचे अनेक फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. लोकेश राहुलने अर्धशतक झळकावून संघाची लाज वाचवली आणि भारतीय संघ 186 धावांवर आटोपला. राहुलने 73 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून डावखुरा फिरकी गोलंदाज शकिब अल हसन याने 36 धावांत पाच तर इबादत हुसेनने 47 धावांत चार बळी घेतले.
बांगलादेशने केलेल्या शानदार गोलंदाजीचा परिणाम म्हणजे भारतीय संघ 41.2 षटकांतच गारद झाला. प्रत्युत्तरात 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शांतो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर लिटन दासने 63 चेंडूत 43 धावांची खेळी करत संघाला थोडा सांभाळण्याचा प्रयत्न केला. भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये बांगलादेशवर निश्चितच वर्चस्व गाजवले.
36 व्या षटकात मैदानात आलेल्या मेहदी हसन मिराजने आपल्या नाबाद 38 धावांच्या चमत्काराने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याने मुस्फिझूर रहमानसोबत 10व्या विकेटसाठी 51 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
वाचा - आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू
सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हा खूप अटीतटीचा सामना होता. सामन्यात पुनरागमन करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न केले. आमची फलंदाजी खराब होती, पण गोलंदाजी उत्कृष्ट होती. आम्ही बांगलादेशच्या खेळाडूंवर शेवटपर्यंत दबाव ठेवला. तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही विकेट्स घेतल्या आहेत. जास्त धावा करता आल्या नाहीत. आणखी 30-40 धावा झाल्या असत्या तर नक्कीच फरक पडला असता. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही चमकदार खेळ केला.
'हिट मॅन' पुढे म्हणाला, 'दुर्दैवाने मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्या, त्यानंतर पुनरागमन करणे कठीण झाले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. फलंदाजी कशी करायची हे समजून घ्यायला हवे. हे कारण नाही, आम्हाला या परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. अशा परिस्थितीत फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी कशी करायची ते पाहावे लागेल. अशा स्थितीत खेळूनच सर्व सहकारी खेळाडू पुढे आले आहेत. हे सर्व दबाव हाताळण्याबद्दल आहे. दबाव कसे हाताळायचे हे एकदा कळले की ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अशा परिस्थितीत दबावाचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. पुढील सामन्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rohit sharma