नवी दिल्ली, 15 जून: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC World Test Championship WTC) फायनल 18 जूनला साऊथम्पटनमध्ये होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत अशा या मॅचसाठी न्यूझीलंडने आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायला आलेल्या मूळच्या 20 खेळाडूंच्या संघातील डग ब्रेसवेल, जेकब डफी, डेरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर यांना अंतिम टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंडने निवडलेल्या संघात कॉलिन डी ग्रँडहोम हा ऑलराउंडर असेल तर विल यंग हा बॅटिंग कव्हर म्हणून जबाबदारी सांभाळेल. बीजे वॉटलिंग दुखापतग्रस्त झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टॉम ब्लेंडेल याला संधी देण्यात आली होती. तोच आता या टीममधील त्यांचा बॅकअप असेल. न्यूझीलंडच्या सिलेक्टर्सनी स्पिनर मिचेल सँटनरच्याऐवजी इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये 4 विकेट घेणारा स्पिनर एजाज पटेलला संघात स्थान दिलं आहे. त्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट टीमचे कोच गॅरी स्टिड म्हणाले,‘ज्या खेळाडूंनी टीमसाठी इतकं केलंय त्यांना निरोप देणं इतकं सोपं नाही. एजबस्टनमधील मॅचमध्ये एजाजचा खेळ पाहून आम्ही त्याला स्पिनर म्हणून संघात स्थान दिलं आहे. या मॅचमध्येही तो उत्तम कामगिरी करेल असा आमचा विश्वास आहे. कॉलिन अनेक वर्षांपासून आमच्या टेस्ट संघात आहे आणि लॉर्ड्सवरच्या मॅचमध्ये त्याचा फॉर्म परत आलेला पाहून आनंद झाला.’ हे वाचा- अरे हा तर गोल झाला! Euro Cup मधला जबरदस्त Video, गोलकीपरही बघतच राहिला न्यूझीलंड संघाने कॅप्टन केन विल्यमसन आणि वॉटलिंग यांच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे. स्टिड पुढे म्हणाले, ‘केन आणि वॉटलिंग यांना विश्रांतीमुळे आराम मिळाला आहे आणि रिहॅबिलिटेशनचा फायदाही झाला आहे. ते तंदुरुस्त होऊन फायनल खेळतील असा आम्हाला विश्वास आहे. ’ भारतीय संघ WTC साठी 3 जूनलाच इंग्लंडला पोहोचला असून त्यांनी इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये जोरदार सरावही केला आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध 2 टेस्ट मॅचच्या मालिकेतील दुसरी मॅच 8 विकेट्सनी जिंकली आहे. पहिली मॅच ड्रॉ झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतक्त्यात भारत सर्वांत वर असून भारताने या स्पर्धेत 12 टेस्ट जिंकल्या आहेत 4 हरला आहे आणि एक ड्रॉ केली आहे. भारताचे 520 पाँइंट्स झाले असून टक्केवारी 72.2 आहे. न्यूझीलंडने 7 टेस्ट जिंकून 4 हरल्या आहेत. त्यांचे 420 पॉइंट्स असून टक्केवारी 70 आहे. आयसीसीने 23 जून हा अधिकचा दिवस म्हणून ठेवला आहे. जर मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात येईल. हे वाचा- विश्वनाथन आनंदसह ‘चीटिंग’ करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर,घटनेनंतर होतायंत ट्रोल असा आहे न्यूझीलंडचा संघ केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लँडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग. असा आहे भारताचा संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकॅप्टन), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के.एल. राहुल, वृद्धिमान साहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.