नवी दिल्ली, 15 जून: एकेकाळी क्रिकेटविश्वातील एक बलाढ्य संघ असलेल्या वेस्ट इंडीज (West Indies) संघाला हरवणारा, ब्रायन लारा, सचिन तेंडूलकरसारख्या (Sachin Tendulkar) दिग्गज खेळाडूंना टक्कर देणारा एक क्रिकेटर व्यसनाच्या आहारी गेल्यानं रस्त्यावर आल्याची घटना अनेकांसाठी धक्कादायक होती. या खेळाडूनं यशंही पाहीलं आणि मिळालेली प्रसिद्धी गमावलीही. एकेकाळी आपल्या देशाचा सुपरस्टार असणाऱ्या या खेळाडूवर कंगाल होण्याची वेळ आली. दारोदार उपाशीपोटी भटकण्याचीही वेळ त्याच्यावर आली होती. हा क्रिकेटपटू दुसरा कोणी नसून केनियाचा (Kenya) माजी कॅप्टन मॉरिस ओडुम्बे (Maurice Odumbe) आहे. आज त्याचा वाढदिवस असून, तो 52 वर्षांचा झाला आहे. मॉरिस ओडुम्बे हा केनियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूपैकी एक आहे. मधल्या फळीत चांगल्या बॅटिंगसह त्याचा ऑफस्पिन (Off Spin) प्रतिस्पर्धी खेळाडूंना जेरीस आणत असे. 1996 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेट (1996 World Cup) स्पर्धेतील मॅचमध्ये मॉरिस ओडुम्बेच्या नेतृत्वाखालील केनियाच्या संघानं बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून सगळ्यांना धक्का दिला होता. केनियानं वेस्ट इंडिजला तब्बल 73 धावांनी हरवलं होतं आणि ओडुम्बे त्या सामन्याचा नायक होता. ओडुम्बेने अवघ्या 14 रन्स देत 3 विकेट घेतल्या होत्या. एक रन आऊट विकेटही त्याच्या नावावर होती. हे वाचा- विश्वनाथन आनंदसह ‘चीटिंग’ करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर,घटनेनंतर होतायंत ट्रोल वर्ल्ड कप उपांत्य फेरीत केनियाला स्थान मिळवून दिलं 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केनियाने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत केनियाच्या कमकुवत वाटणाऱ्या संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. केनियाच्या या यशात ओडुम्बेचं मोलाचं योगदान होतं. ओडुम्बेने या स्पर्धेत 42च्या सरासरीने रन्स केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. यानंतर ओडुम्बेनं लिव्हरवर्ड बेटांवर झालेल्या कॅरेबियन कॅरिब बीयर मालिकेत 207 रन्सची खेळी केली. 2004 मध्ये मात्र ओडुम्बेच्या झंझावाती कारकिर्दीची घसरण सुरू झाली. ओडुम्बेवर 5 वर्षांसाठी बंदी 2004मध्ये आयसीसीच्या (ICC) तपासणीत ओडुम्बेचा क्रिकेट बुकींशी संबंध असल्याचं उघडकीस आलं आणि त्याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर जागतिक क्रिकेटच्या दुनियेत चमकणारा तारा अचानक गायब झाला. मॉरिस ओडुम्बेची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, एक वेळ अशी होती की त्याच्याकडं अन्न खाण्यासाठीही पैसे नव्हते, भुकेल्यापोटी तो रस्त्यावर फिरत होता. एवढंच नव्हे तर त्याला ड्रग्ज घेण्याचंही व्यसन लागलं होतं. ओडुम्बेनं त्याच्या या परिस्थितीसाठी आपल्या पत्नीला जबाबदार ठरवलं होतं. आयसीसीला तिनं खोटा जबाब दिल्याचा आरोप त्यानं केला होता. हे वाचा- WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण झालं IN आणि कोण OUT केनियातील दी स्टँडर्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओडुम्बेनं सांगितलं की, ‘तपासणी अधिकाऱ्यांनी माझ्या पत्नीशी संपर्क साधला होता. माझ्या बायकोला त्यांनी काय सांगितलं ते मला माहित नाही. तिनं तपास अधिकाऱ्यांचे म्हणणं मान्य केलं आणि ते जे सांगतील तसं केलं. त्यांना मला धडा शिकवायचा होता, असं मला वाटतं.’ ओडुम्बे पुढं म्हणाला, ‘माझी परिस्थिती खूप खराब झाली होती. फार वेदनादायक काळ होता. मी ड्रग्ज घेऊ लागलो. मलाही रिहॅबचीही गरज होती.’ अशा परिस्थितीतही ओडुम्बेनं हार मानली नाही. पाच वर्षाची बंदी संपल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आला आणि वयाच्या 40 व्या वर्षी तो केनियाच्या स्थानिक क्रिकेटविश्वात दाखल झाला. एप्रिल 2018 मध्ये तो केनियाच्या संघाचा प्रशिक्षक बनला. मात्र 6 महिनेही तो या पदावर टिकू शकला नाही आणि त्याच्या जागी डेव्हिड ओबुयाला प्रशिक्षक बनवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.