कतार, 18 नोव्हेंबर: जगातला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. याच फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये रंगणार आहे. कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचं बिगुल वाजण्यास आता केवळ काही तास उरले आहेत. यंदा पहिल्यांदाच आखाती देशात फुटबॉल वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातंय. पण यादरम्यान वर्ल्ड कपमधल्या संघांना दिल्या जाणाऱ्या बक्षिस रकमेची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. फिफानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बक्षिसांची खैरात केली आहे. ती पाहता नुकत्याच झालेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील विजेत्याला मिळणारी बक्षिस रक्कम अगदीच नगण्य वाटतेय.
फिफाचं बिग बजेट
फिफानं यंदाच्या वर्ल्ड कपसाठी तब्बल 3578 कोटी इतकी एकूण बक्षिस रक्कम ठेवली आहे. आयसीसीच्या टी20 वर्ल्ड कप बक्षिस रकमेच्या तुलनेत हा आकडा शेकडो पट मोठा आहे. कारण आयसीसी टी20 वर्ल्ड कपसाठी यंदा एकूण बक्षिस रक्कम होती केवळ 45 कोटी. फिफाची बक्षिस रक्कम ही आयसीसीपेक्षा तब्बल 80 पटीनं जास्त आहे.
32 वी टीमही होणार मालामाल
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 16 टीम्स बाद फेरीत प्रवेश करतील. पण बाद फेरीत स्थान न मिळू शकलेल्या उरलेल्या 16 टीम्सना प्रत्येकी जवळपास 73 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम टी20 चॅम्पियन ठरलेल्या टीमला मिळालेल्या बक्षिस रकमेच्या 6 पट जास्त आहे. टी20 चॅम्पियन इंग्लंडला 13 कोटी रुपये मिळाले होते.
विजेत्याला मिळणार किती रक्कम?
फिफा वर्ल्ड कपमध्ये 9 ते 16 नंबरच्या संघांना 106 कोटी रुपये मिळतील. तर पाच ते 8 व्या नंबरच्या टीम्सना 138 रुपये बक्षिस मिळेल. चौथ्या स्थानावरच्या टीमला 203 कोटी तर तिसऱ्या नंबरवरच्या टीमला 220 कोटींचं घसघशीत बक्षिस मिळेल. विजेत्या टीमला 342 कोटी आणि उपविजेत्या टीमला 244 कोटी रुपयांचं इनाम मिळेल.
Just three more days until the #FIFAWorldCup 😍 pic.twitter.com/sTZsOeIJvA
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 17, 2022
18 डिसेंबरला फायनल
20 नोव्हेंबरला सुरु होणारा वर्ल्ड कपचा हा महासंग्राम 29 दिवस चालणार आहे. 18 डिसेंबरला या वर्ल्ड कपची मेगा फायनल खेळवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup, Football, Icc, Sports