मुंबई, 13 डिसेंबर : कतार फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. या स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि नेमार ज्युनियरचा ब्राझील हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. त्यामुळे सर्वांची नजर मेस्सीच्या अर्जेंटिनावर आहे. अर्जेंटिना सेमीफायनलमध्ये उतरण्याआधी मोठा वाद निर्माण झाला आहे. मेस्सी आणि रेफ्री मटेऊ लेहोस यांच्यातला हा वाद आहे. रेफ्रींबाबत मेस्सीने तक्रार केली होती. यावर सुनावणी करताना फिफाने कठोर सुनावणी करताना रेफ्रीलाच स्पर्धेतून बाहेर घालवलं आहे. हेही वाचा : IND vs BAN : व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजारासह ‘हे’ 2 खेळाडू करणार मोठा रेकॉर्ड! अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यावेळी मेस्सीचा अनेक खेळाडुंसोबत वाद झाला होता. त्या सामन्यात लेहोस हे रेफ्री होते. त्यांनी नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 15 यलो कार्ड दाखवले होते. अनेक निर्णय असे होते की ज्यामुळे मैदानावर हाणामारीची वेळ आली होती. क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाने रोमहर्षक सामन्यात नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटवर हरवलं होतं. या सामन्यात अनेक वाद झाले होते. काही वेळा दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले होते. रेफ्रींनी मेस्सीला यलो कार्डही दाखवलं होतं. तर नेदरलँडच्या डेंजेल डमफ्रीजला सामन्यानंतर रेड कार्डही दाखवलं होतं. सामन्यानंतर मेस्सीने रेफ्रींच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच महत्त्वाच्या सामन्यात लेहोस यांच्यासारखे रेफ्री असू नयेत असंही त्यांनी म्हटलं होतं. हेही वाचा : FIFA World Cup 2022 : अर्जेंटीना की क्रोएशिया? पाहा कोल्हापूरच्या फॅनचा कुणाला सपोर्ट, Video
आता फिफाने लेहोस यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून उर्वरित चार सामन्यात ते दिसणार नाहीत. मेस्सीशिवाय लेहोस यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना फिफाने स्पर्धेतून बाहेर काढून थेट घरी पाठलं आहे.