कोल्हापूर, 13 डिसेंबर : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप 2022 आता अखेरच्या टप्प्यात आहे. या वर्ल्ड कपसाठी दाखल झालेल्या 32 पैकी आता फक्त 4 टीम शिल्लक आहेत. अर्जेंटीना, क्रोएशिया, मोरोक्को आणि फ्रान्स या चार टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. आता पुढील तीन मॅचमध्ये यापैकी एक टीम विश्वविजेता ठरेल. संपूर्ण जगावर फुटबॉल वर्ल्ड कपचा फिव्हर चढलेला असताना कोल्हापूर शहरही यामध्ये मागे नाही. कोल्हापूरच्या अर्जेंटिना आणि क्रोएशिया समर्थकांमध्ये सध्या वेगळीच चुरस बघायला मिळत आहे. कोण आहे दावेदार? अर्जेंटिनाचा अटॅक आणि क्रोएशियाचा डिफेन्स यांच्यात सेमी फायनलमध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल. मेस्सीच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटीनाची वर्ल्ड कपमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. आता सेमी फायनलमध्येही धडाकेबाज कामगिरी करत टीम फायनलमध्ये एन्ट्री करेल,’ असं मत अर्जेंटिनाचा फॅन अक्षय शिंदेनं व्यक्त केलं. तर, ‘क्रोएशियानं 2018 साली झालेल्या वर्ल्ड कपची फायनल खेळलीय. या वर्ल्ड कपमध्ये ही टीम डार्क हॉर्स ठरलीय. दिग्गज टीमनं दुर्लक्ष केलेली ही टीम सेमी फायनलमध्ये दाखल झालीय. या वाटचालीत त्यांनी टॉपच्या टीमना पराभूत केलं आहे. क्रोएशिएचा गोलकिपर प्रतिस्पर्धी टीमसाठी मोठा अडथळा आहे. या टीमची व्यूहरचना इतरांच्या सहसा लक्षात येत नाही, त्यामुळे यंदा देखील ही टीम फायनलमध्ये जाईल,’ असा विश्वास क्रोएशियाचा समर्थक रोहित कुरणे याने व्यक्त केलाय. नेमारला रडवणाऱ्या क्रोएशियाच्या निशाण्यावर मेस्सीचा संघ, कोण जिंकणार? मेस्सीशिवाय कोण? ‘अर्जेंटिनाकडं कॅप्टन मेस्सीसह गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझ, पाउलो डिबाला, अँजेल डी मारिया असे दिग्गज खेळाडू आहेत. या खेळाडूंमुळे अर्जेटींना सर्वोत्तम खेळ करत आहे. यंदा अर्जेंटीनानंच वर्ल्ड कप जिंकावा,’ अशी भावना मेस्सीचा कट्टर फॅन निखिल यादवनं व्यक्त केली. ‘अर्जेंटिना आणि क्रोएशिया हे दोन्ही देखील तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे कोण वरचढ ठरेल याचा अंदाज लावणे थोडे अवघड वाटत आहे. कारण अर्जेंटिना गेली ३६ मॅचमध्ये पराजित झालेली नव्हती. त्यानंतर सौदी अरेबियासोबत थोडी हार पत्करावी लागली. असे असले तरी संघाची कामगिरी ही अप्रतिम आहे. हे सर्व खरं असलं तरी मागच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये क्रोएशिया होती हे विसरता येणार नाही, त्यामुळे थोडीफार धाकधूक मनामध्ये आहे. पण बघू शेवटी हा खेळ आहे. खेळात कुणीतरी हारणार आणि कुणीतरी जिंकणार,’ असे मत रतन पाल या फुटबॉल प्रेमीने व्यक्त केलं.
कुणामध्ये होणार फायनल? कोल्हापूरातील बहुतेक फुटबॉल प्रेमी हे अर्जेंटीनाचे समर्थक आहेत. अर्जेंटीना विरुद्ध फ्रान्स ही वर्ल्ड कप फायनल व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पहिली सेमी फायनल सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूरकरांना फायनलचेही वेध लागले आहेत.