मुंबई, 13 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. तीन मॅचेसची वन-डे सीरिज पार पडल्यानंतर आता दोन्ही टीम्स टेस्ट सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. बुधवारपासून (14 डिसेंबर) पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. नियमित कॅप्टन रोहित शर्मा दुखापतीमुळे टेस्ट मॅचेस खेळू शकणार नाही. त्यामुळे के. एल. राहुल टीमचं नेतृत्व करील. रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या तिघांसाठी ही सीरिज जास्त विशेष ठरू शकते. हे तिघेही विविध रेकॉर्ड्सच्या अगदी जवळ आहेत. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारताच्या टेस्ट टीमचा व्हाइस कॅप्टन असलेला चेतेश्वर पुजारा या सीरिजमध्ये सात हजार रन्सचा टप्पा पार करू शकतो. चेतेश्वर पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये सात हजार रन्सच्या अगदी जवळ पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने चार इनिंगमध्ये 209 रन्स केले, तर तो या विक्रमाला स्पर्श करू शकतो. सध्या त्याच्या नावावर 96 टेस्ट क्रिकेट मॅचेसमधील 164 इनिंगमध्ये 43.81च्या सरासरीनं 6792 रन्स आहेत. बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आर. अश्विन हा सर्वांत जलद 450 विकेट्स घेणारा दुसरा स्पिन बॉलर ठरू शकतो. 450 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आठ विकेट्सची आवश्यकता आहे. बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचेसमध्ये त्यानं आठ विकेट्स घेतल्या, तर तो 450हून अधिक टेस्ट विकेट्स घेणारा दुसरा भारतीय आणि जगातला नववा बॉलर ठरेल. सध्या त्याने 86 टेस्ट मॅचेसमधल्या 162 डावांमध्ये 442 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याच्यापूर्वी, अनिल कुंबळेने 93 टेस्ट मॅचेसमध्ये 450 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वांत जलद 450 टेस्ट विकेट्सचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 80 मॅचेसमध्ये हा पराक्रम केला होता. पुजाराला उपकर्णधार केल्यानं वाद; केएल राहुल म्हणाला… चेतेश्वर पुजारा आणि आर. अश्विननंतर ऋषभ पंतदेखील टेस्ट क्रिकेटमध्ये एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. टेस्ट क्रिकेटमधल्या वैयक्तिक 50व्या सिक्सपासून तो दोन पावलं दूर आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमध्ये दोन सिक्सर्स मारले, तर तो वीरेंद्र सेहवाग, एम. एस. धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, कपिल देव, सौरव गांगुली आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा भारताचा आठवा खेळाडू ठरेल. याशिवाय 25 रन्स केल्यानंतर पंतच्या टेस्ट क्रिकेटमधल्या चार हजार रन्सही पूर्ण होतील. WTC Point Table : फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला संधी मिळणार का? भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या 22 वर्षांत आतापर्यंत 11 टेस्ट मॅचेस झाल्या आहेत. त्यांपैकी भारताने नऊ मॅचेस जिंकल्या आहेत आणि दोन ड्रॉ राहिल्या आहेत. म्हणजेच बांगलादेशने भारताविरुद्ध आतापर्यंत एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.