मुंबई, 10 मार्च : टीम इंडियाचा हमखास सिक्स मारणारा खेळाडू कोण? असा प्रश्न विचारला की रोहित शर्मा (Rohit Sharma), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), युवराज सिंह (Yuvraj Singh) किंवा वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) या खेळाडूंची नाव हमखास आठवतात. हे सर्वजण त्यांच्या आक्रमक खेळासाठी आणि खेळताना सहज सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्याही पूर्वी भारताचे एक खेळाडू सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध होते. आयपीएल (IPL) किंवा वन-डे क्रिकेट सुरु होण्याच्यापूर्वी ते क्रिकेट खेळत. पण त्यांचा सिक्स मारण्यात हातखंडा होता. मैदानात मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मागणी केली की सिक्स मारण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. भारताचे ओरिजनल ‘सिक्सर किंग’ अर्थात सलीम दुर्राणी (Salim Durani) यांचा एक ताजा फोटो रामेश्वर सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. 1960 च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले सलीम दुर्राणी आता 87 वर्षांचे आहेत. रामेश्वर सिंह यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांचे वय जाणवत आहे. दुर्राणी एका खुर्चीवर बसलेले असून त्यांच्या पाठीमागे त्यांचे तरुणपणीचे फोटो तसेच क्रिकेट खेळताना जिंकलेल्या ट्रॉफी ठेवण्यात आल्या आहेत.
Salim Durani latest pic. pic.twitter.com/3GqImzcB4X
— Rameshwar Singh (@RSingh6969a) March 9, 2021
कोण आहेत सलीम दुर्राणी? भारतीय टीमधील डावखुरे बॉलर आणि बॅट्समन असलेले दुर्राणी हे हमखास सिक्स लगावण्याच्या क्षमतेबद्दल ओळखले जात. 1960 ते 73 या कळत त्यांनी 29 टेस्टमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. इंग्लंड विरुद्ध 1961-62 साली झालेल्या मालिकेत भारताने जिंकलेल्या टेस्टचे ते हिरो होते. त्याचबरोबर त्यानंतर दहा वर्षांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतानं मिळवलेल्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या टेस्टमध्ये त्यांनी सलग दोन बॉलवर क्लाईव्ह लॉईड (Clive Lloyd) आणि गॅरी सोबर्स (Gary Sobbers) यांना आऊट करुन भारताच्या विजयाचे दार उघडले होते. (हे वाचा- ‘आम्हाला भारताविरुद्ध खेळवा’, केव्हिन पीटरसनची निवड समितीकडं मागणी ) दुर्राणी यांनी गुजरात, सौराष्ट्र आणि राजस्थान या तीन टीमकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 14 शतकं त्यांच्या नावावर आहेत. दुर्राणी यांची लोकप्रियता इतकी होती की कानपूर टेस्टमध्ये त्यांना वगळल्यानंतर तेथील प्रेक्षकांनी निदर्शने केली होती. ‘दुर्राणी नाही तर टेस्ट नाही’ (No Durani, No Test) अशी त्यांनी घोषणाबाजी केली होती. सलीम दुर्राणी हे अफगाणिस्तानमध्ये जन्मलेले भारताचे एकमेव क्रिकेटपटू आहेत. अफगाणिस्तानच्या टीमने 2018 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी बंगळुरुमध्ये झालेल्या टेस्टला ते उपस्थित होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) त्यांचा सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानं देखील गौरव केला आहे. परवीन बॉबीची मुख्य भूमिका असलेल्या चरित्र या सिनेमातही दुर्राणी यांनी काम केले आहे.