मुंबई, 7 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारतासह एकूण चार टीम्सनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या स्पर्धेतील कामगिरीमध्ये माजी कॅप्टन विराट कोहलीसह सूर्यकुमार यादवचं मोठं योगदान आहे. भारताचा स्टार बॅटर सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्याने प्रतिस्पर्धी बॉलर्सची चांगलीच धुलाई केली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने पाचपैकी तीन मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. यादरम्यान, सूर्यकुमारचा गेम प्लॅन कसा ठरतो? याबाबत क्रिकेट फॅन्सच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सूर्यकुमारनं या T-20 वर्ल्ड कपमध्ये तीन हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 आणि नेदरलँडविरुद्ध नॉटआउट 51 रन्स केले होते. रविवारी (6 नोव्हेंबर) झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं नॉटआउट 61 रन्सची खेळी केली. आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमारनं आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकलं आहे. टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन ठरला आहे. तो समोरच्या बॉलर्सची जोरदार धुलाई करतो. ग्राउंडमध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हेच कारण आहे की, सध्या त्याला क्रिकेट जगतातील ‘मिस्टर 360’ असंदेखील म्हटलं जातं. अशी फटेबाजी करण्यासाठी सूर्यकुमार प्रत्येक सामन्यापूर्वी फक्त दोन नियम पाळतो. एक नियम तो स्वतःचा पाळतो तर दुसरा नियम त्याची पत्नी पाळते.
चार वर्षांपासून करतो नियमांचं पालन इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमारची पत्नी देविशा जवळजवळ प्रत्येक दौऱ्यावर त्याच्यासोबत असते. प्रत्येक सामन्यापूर्वी ती सूर्याचा फोन त्याच्याकडून स्वत:कडे घेते. यामुळे सूर्यावर विनाकारण किंवा अतिरिक्त दबाव राहत नाही. फोन सोबत नसल्यामुळे तो त्याच्या गेम प्लॅन अंतर्गत वेगळ्या मेंटल झोनमध्ये राहतो. एकाग्र राहिल्यामुळे तो सतत चांगली कामगिरी करू शकतो. नुकतंच सूर्यकुमारला विचारण्यात आलं होतं, की तो मॅचच्या एक दिवस आधी कोणता गेम प्लॅन करतो? याला उत्तर देताना सूर्यकुमारनं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, ‘गेल्या चार वर्षांपासून मी मॅचच्या एक दिवस अगोदर सुट्टी घेतो. मला जो काही सराव करायचा आहे तो मी दोन दिवस अगोदरच करतो. या गोष्टीचा मला खूप फायदाही झाला आहे.’ सेमी फायनलमध्ये रोहित लगान वसूल करणार! असं आहे भारताचं इंग्लंडविरुद्धचं रेकॉर्ड सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘मॅचच्या एक दिवस आधी मी माझ्या पत्नीसोबत वेळ घालवतो. क्रिकेटपासून दूर राहतो. मी खेळत चांगला असो किंवा नसो, माझी पत्नी मला नेहमीच साथ देते. मी जसा आहे तसाच राहिलं पाहिजे, ही बाब तिनं माझ्या मनावर बिंबवली आहे.’ एका वर्षात हजारपेक्षा जास्त टी-20 रन्स सूर्यकुमारनं जानेवरी 2022 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने एक हजार रन्सचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा या वर्षातील तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.