मुंबई, 17 सप्टेंबर : अफगाणिस्तानात सत्ता काबिज करणाऱ्या तालिबानमुळे (Taliban in Afghanistan) संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. त्याचवेळी पाकिस्ताननं मात्र तालिबानची उघड बाजू घेतली आहे. दहशतवादी तालिबानला पाठिशी घालण्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली असून त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा जगात नाचक्की झाली आहे. तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड क्रिकेट टीमनं पहिल्या वन-डे सुरु होण्यास काही वेळ बाकी असताना संपूर्ण दौरा सुरक्षेच्या कारणामुळे रद्द (New Zealand tour of Pakistan Called off) केला आहे.
पंतप्रधानांच्या आश्वासनावरही विश्वास नाही
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं या दौऱ्याच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनीही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी वैयक्तिक चर्चा करुन याबाबतची माहिती दिली होती. आमच्याकडं जगातील सर्वात चांगली गुप्तचर संस्था आहे. तसंच न्यूझीलंडच्या टीमला सुरक्षेचा कोणताही धोका नाही, असा दावा खान यांनी केला होता. त्या आश्वासानाचाही काही फायदा झाला नाही.
न्यूझीलंड सरकारनं वाढता धोका लक्षात घेऊन बोर्डाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता टीमला माघारी बोलवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 'आम्हाला मिळालेल्या सल्ल्यानुसार पाकिस्तानचा दौरा कायम ठेवणे शक्य नाही,' असं न्यूझीलंड बोर्डाचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी सांगितलं.
पाकिस्तानात खेळण्यास न्यूझीलंडचा नकार, टॉसच्या काही वेळ आधी घेतला मोठा निर्णय
2002 साली रद्द झाला होता दौरा
न्यूझीलंड टीमनं 2002 साली केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात कराचीमधील टीमच्या हॉटेल बाहेर बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडनं पाकिस्तानचा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर 2003 साली पाकिस्ताननं न्यूझीलंडमध्ये पाच वन-डे मॅच खेळल्या होत्या. तो न्यूझीलंडचा शेवटचा पाकिस्तान दौरा होता. दोन्ही देशांमधील तीन वन-डे 17, 19 आणि 21 सप्टेंबर रोजी रावळपिंडीमध्ये होणार होत्या. त्यानंतर 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत 5 टी 20 सामने होणार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, New zealand, Pakistan, Taliban