मुंबई, 31 मार्च : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 31 मार्च हा दिवस एका वेदनादायी आठवणीशी निगडीत आहे. आजच्याच दिवशी (On this day) 1997 साली बार्बोडसमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा धक्कादायक पराभव झाला होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या टेस्टमध्ये 120 रनचं माफक आव्हान टीम इंडियाला (Team India) पेलवलं नाही. भारताची संपूर्ण टीम फक्त 81 रनवर ऑल आऊट झाली. या धक्कादायक पराभवामुळे तेव्हाचा टीम इंडियाचा कॅप्टन सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चांगलाच व्यथित झाला होता. या पराभवानंतर आपण कॅप्टनसी सोडण्याचा विचार केला होता, असा खुलासा सचिननं त्याच्या 'Playing it My Way' या आत्मचरित्रामध्ये केला आहे.
टेस्टमध्ये काय झाले होते?
वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा (Brian Lara) याची कॅप्टन म्हणून ती पहिलीच टेस्ट होती. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना शिवनारायण चंद्रपॉलच्या शतकाच्या जोरावर 298 रन केले. त्याला उत्तर देताना भारताकडून सचिन तेंडुलकर (92) आणि राहुल द्रविड (78) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 319 पर्यंत मजल मारली.
पहिल्या डावात भारताला 21 रनची छोटी आघाडी मिळाली होती. भारतीय बॉलर्सनी दुसऱ्या डावात आणखी भेदक मारा केला. वेस्ट इंडिजची दुसरी इनिंग ही फक्त 140 रनवर संपुष्टात आली. वेस्ट इंडिजमध्ये 1976 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकण्यासाठी भारताला चौथ्या इनिंगमध्ये फक्त 120 रनची आवश्यकता होती.
भारताची भक्कम बॅटींग ऑर्डर पाहता हे लक्ष्य नक्कीच सोपे होते. पण फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या बार्बोडसच्या पिचवर चौथ्या इनिंगमध्ये भारताची बॅटींग ऑर्डर कोसळली. लक्ष्मण, सिद्धू, द्रविड, सचिन, अझहरुद्दीन आणि गांगुली अशा दिग्गज बॅट्समनचा समावेश असूनही भारताची इनिंग फक्त 81 रनवर संपुष्टात आली. भारताकडून व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या एकमेव बॅट्समने दोन अंकी रन (19) केले. त्यानंतर अतिरिक्त रनचे (15) सर्वाधिक योगदान होते.
तो सर्वात खराब दिवस - सचिन
सचिन तेंडुलकरनं त्याच्या आत्मचरित्रात या पराभवाच्या वेदनादायी आठवणी मांडल्या आहेत. 'सोमवार, 31 मार्च 1997 हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक काळा दिवस होता. तो माझ्या कॅप्टनसीच्या करियरमधील सर्वात वाईट दिवस होता. आदल्या रात्री मला भारताच्या विजयाबद्दल खात्री होती. वेस्ट इंडिज मॅच जिंकणार असा दावा करणाऱ्या हॉटेलमधील वेटरची मी थट्टा केली होती.
आमची इनिंग आश्चर्यकारक पद्धतीनं 81 रनवर संपुष्टात आली. वेस्ट इंडिजनं 38 रननं मॅच जिंकली. ते पिच अवघड असले तरी या खराब बॅटींगला कोणतेही कारण देता येणार नाही. मला कुणावरही याचा दोष द्यायचा नाही. ती माझ्या खेळाची पद्धत नाही. त्या परिस्थितीमध्ये मी टीमचा कॅप्टन होतो आणि टीमला विजय मिळवून देण्याची माझी जबाबदारी होती.
( On This Day : वर्ल्ड कपमधील प्रतिष्ठेच्या लढतीत भारताकडून पाकिस्तानचा पत्ता कट )
आम्हाला अतिआत्मविश्वास नडला असे मला वाटत नाही. पण तरीही लक्ष्मण सोडून एकही बॅट्सन दुसऱ्या इनिंगमध्ये दोन अंकी रन करु शकला नाही. माझ्या कारकीर्दीमधील ते सर्वात खराब बॅटींगचे प्रदर्शन होते.' अशी व्यथा सचिनने त्याच्या आत्मचरित्रात व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, On this Day, Sachin tendulkar, Sports, Team india