मुंबई, 30 मार्च : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक क्रिकेट मॅचचं दोन्ही टीममधील खेळाडूंना टेन्शन असतं. त्यामध्ये ही लढत वर्ल्ड कपमध्ये होणार असेल तर हे दडपण आणखी वाढतं. कोणत्याही वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीमसाठी ती सर्वात प्रतिष्ठेची लढत असते. '2003 मधील वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी 12 मॅच आपण झोपू शकलो नव्हतो,' अशी कबुली सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने दिली होती.
2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिनला इतका विचार करण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही टीम अत्यंत कमी दिवसांच्या नोटीशीमध्ये एकमेकांच्या समोर सेमी फायनलमध्ये उभ्या राहिल्या. आजच्याच दिवशी 2011 साली (30 मार्च 2011) झालेल्या या लढतीमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती.
सचिनच्या 100 व्या सेंच्युरीची प्रतीक्षा
मोहालीमध्ये झालेल्या त्या लढतीमध्ये भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. सचिन तेंडुलकरच्या 100 व्या सेंच्युरीचं काऊंटडाऊन तेव्हा सुरू झालं होतं. सचिननं वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या विकेसाठी 48 रनची भागिदारी केली. सेहवाग 38 रन काढून आऊट झाला. त्यानंतर सचिननं गौतम गंभीर (27) सोबत छोटी भागिदारी केली. मात्र त्यानंतर विराट कोहली (9) आणि युवराज सिंह (0) रन काढून झटपट आऊट झाल्यानं भारताची अवस्था बिकट झाली होती.
सचिन तेंडुलकर मात्र एका बाजूला उभा होता. सचिनच्या खेळाला पाकिस्तानच्या फिल्डर्सनी देखील समर्थ साथ दिली. त्यांनी सचिनला आऊट करण्याच्या 4 संधी सोडल्या. सचिनची 100 वी सेंच्युरी मात्र त्या दिवशी पूर्ण झाली नाही. सचिन 85 रन काढून आऊट झाला. सचिन आऊट झाल्यानंतर सुरेश रैनानं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 261 रनचं आव्हान ठेवल.
पाकिस्तान दबाव पेलण्यास असमर्थ
पाकिस्तानसाठी 261 रनचं आव्हान कठीण नव्हतं. पण त्यांची टीम वर्ल्ड कप सेमी फायनल आणि भारताविरुद्धची मॅच याचा दबाव पेलू शकली नाही. त्यांच्या ठराविक अंतरानं विकेट्स पडत गेल्या. भारताकडून झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंह या पाचही बॉलर्सनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून मिसबाह-उल-हकने सर्वात जास्त 56 रन काढले. पाकिस्तानची संपूर्ण टीम 231 रनवर ऑल आऊट झाली. भारताने 29 रननं पराभव करत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
( On This Day : सचिनने घडवला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा एकमेव क्रिकेटपटू )
या विजयासोबतच भारताने वर्ल्ड कपमधील पाकिस्तान वरील विजयाची परंपरा देखील कायम ठेवली. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा पाकिस्तानवरील हा सलग पाचवा विजय होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India, On this Day, Pakistan, Sachin tendulkar