नवी दिल्ली, 29 एप्रिल: कोविड संक्रमणाच्या (
Coronavirus) भीतीने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून (
IPL 2021) माघार घेण्याचा ओघ सध्या सुरूच आहे. आधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी तसंच काही अधिकाऱ्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. आता एलिट पॅनलमधले दोन अंपायर नितीन मेनन (
Nitin Menon) आणि पॉल राफेल (
Paul Reiffel) यांनी खासगी कारणांसाठी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 9 एप्रिलला ही स्पर्धा सुरू झाली असून ती 30 मेला संपणार आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी सर्व काळजी आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयनी (
BCCI) घेतली आहे. यंदाही प्रेक्षकांविनाच सामने खेळवले जात आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आई आणि पत्नी दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे नितीन मेनन त्यांच्या घरी इंदूरला निघून गेले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे (
Australia) अंपायर पॉल राफेल काही दिवसांपूर्वीच मायदेशी गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतातील वाढते संक्रमण लक्षात घेता भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. ही निर्णय लागू होण्यापूर्वीच राफेल ऑस्ट्रेलियाला निघून गेले.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानी सांगितलं की नितीन मेनन यांना एक लहान मुलगा आहे. त्यांची आई आणि बायको दोघीही कोरोना संक्रमित झाल्यामुळे मेनन यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राफेल यांना चिंता होती की ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली तर आपण भारतातच अडकून पडू. या दोघांऐवजी इतर काही भारतीय अंपायर आता स्पर्धेमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
(हे वाचा-IPL 2021 : 'सुपरमॅन' डुप्लेसिस, धोकादायक पांडेचा घेतला भन्नाट कॅच, VIDEO)
अश्विनसह अनेकांनी घेतली माघार
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा एडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय या क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय ऑफ स्पिनर आर. अश्विन यानीही कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून आयपीएलमधून माघार घेतली आहे. इंग्लंडचा (England) खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन याला सतत बायोबबलमध्ये राहून प्रचंड थकवा आल्याने तो मायदेशी परतला. तसंच बेन स्टोक्सही त्याच्या मायदेशी गेला. मेनन आणि राफेल हे पहिले अंपायर आहेत ज्यांनी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बीसीसीआयनी दिली होती हमी
खेळाडू एकापाठोएक माघार घेत असल्याचं लक्षात आल्यावर बीसीसीआयने त्यांना शाश्वती देण्याचा प्रयत्न केला. ही स्पर्धा संपल्यानंतर सर्व परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात पोहोचवण्यासाठी बीसीसीआय पूर्णपणे मदत करेल अशी हमी बीसीसीआयने मंगळवारी खेळाडूंना दिली होती. बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन (
Hemang Amin) यांनी खेळाडूंना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं,‘ ही स्पर्धा संपल्यावर आपण आपल्या देशात कसं पोहोचू शकू याची चिंता आपल्यापैकी अनेक खेळाडूंना वाटते आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की या गोष्टीची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सुखरूप तुमच्या मायदेशी पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआय सांभाळेल. ’
(हे वाचा-IPL 2021 : ...तोपर्यंत आयपीएल संपणार नाही, BCCI ची परदेशी खेळाडूंना हमी)
खेळाडूंना बीसीसीआयनी आश्वस्त केल्यानंतरही ते माघार घेत आहेत आणि आता अंपायरही माघार घेत आहेत त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबद्दल बीसीसीआय काही वेगळा निर्णय घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.