मुंबई, 29 एप्रिल : भारतात (India) कोरोना (Corona Virus) रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात आयपीएलमध्ये (IPL 2021) सामील झालेल्या काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धा मध्येच सोडून आपल्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तीन ओस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बीसीसीआयनं (BCCI) परदेशी खेळाडूंना थांबवण्यासाठी त्यांना स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्या देशात सुखरूप परत पाठविण्याची जाहीर हमी दिली आहे. मंगळवारी बीसीसीआयनं याबाबत एका पत्राद्वारे(Letter) खेळाडूंना हा संदेश दिला आहे. 30 मे रोजी अहमदाबाद इथं आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.
गेले दोन आठवडे सहा ठिकाणी प्रेक्षकांविना सामने सुरळीत पार पडल्यानंतर कोरोना संकटाची तीव्रता वाढत असल्यानं ऑस्ट्रेलियाचा राजस्थान रॉयल्समधील (Rajasthan Royals) पेस बॉलर अँड्र्यू टाय (Andrew Tye), लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) याच्यासह रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधील (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि ॲडम झम्पा (Adam Zampa) अशा चौघांनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानं (Australia) मंगळवारपासून 15 मेपर्यंत थेट भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर(Flights)बंदी घातली आहे.
आयपीएलमध्ये अद्याप ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आदी क्रिकेटपटूंसह प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सिमोन कटीच, डेव्हिड हसी, समालोचक (Commentators) मॅथ्यु हेडेन, ब्रेट ली, लिसा स्थळेकर आदी 14 जण सहभागी आहेत. काहींनी परत जाण्याचा निर्णय घेतल्यानं इतरांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती; पण त्यांनी स्पर्धा पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचं डेव्हिड हसी यानं सांगितलं. याशिवाय इंग्लंड आणि न्यूझीलंडचेही अनेक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी असून, त्यांनी याबाबत काही चिंता दर्शवलेली नाही.
स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येक खेळाडूला त्याच्या मायदेशी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआयनं घेतली असून, त्यासाठी सर्व व्यवस्था करण्याबाबत संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे, असं बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमिन(Hemang Amin)यांनी या पत्रात म्हटलं आहे. सध्याच्या या परिस्थितीतही भारतात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे त्यांनी कौतुक केलं असून, या परिस्थितीत या सामन्यांमुळे लोकांना विरंगुळ्याचे चार क्षण मिळत आहेत. काही काळ का होईना ते सगळं विसरून खेळाचा आनंद घेत आहेत. हे फार मोठं काम तुमच्यामुळे शक्य होतं आहे. लाखो लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही एक मिनिट का होईना हसू फुलवत आहात, ही खूप मोठी कामगिरी आहे. आता तुम्ही फक्त जिंकण्यासाठी खेळत नाहीत, तर खूप महत्त्वाच्या कारणासाठी खेळत आहात,अशा शब्दात अमिन यांनी खेळाडूंची प्रशंसा केली आहे.
दरम्यान,आता खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ते ज्या हॉटेलमध्ये उतरले असतील तिथं बाहेरून खाद्यपदार्थ मागविण्यास मनाई करण्यात आल्याचं अमिन यांनी स्पष्ट केलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनंच हे पाऊल उचलण्यात आल्यानं सर्व खेळाडू सहकार्य करतील अशी अपेक्षा अमिन यांनी व्यक्त केली आहे. तसंच जोपर्यंत तुम्ही सुखरूप घरी पोहोचत नाही, तोपर्यंत आमच्यासाठी आयपीएल स्पर्धा संपणार नाही, असं बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Coronavirus, IPL 2021