मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) शेवटच्या लीग मॅचमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गवसला. विराटनं गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. विराटच्या या खेळीच्या जोरावर आरसीबीनं गुजरातचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे. आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे. या सिझनमध्ये खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या विराटसाठी हे अर्धशतक महत्त्वाचं आहे. त्याचं या सिझनमधील हे दुसरंच अर्धशतक असून सर्वोच्च धावसंख्याही आहे.
विराटनं मॅचनंतर सांगितलं, 'आज भरपूर भावना आहेत. ही मॅच आमच्यासाठी महत्त्वाची होती. मी टीमला दोन पॉईंट दिल्याबद्दल खूश आहे. तुम्ही फक्त योग्य भूमिकेतून काम केलं पाहिजे. इतकी वर्ष खेळल्यानंतर अपेक्षा असणारच. त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. मी काल 90 मिनिटे नेटमध्ये घालवली. मी तिथं सर्व प्रकारच्या बॉलचा अभ्यास केला. त्यामुळे मी आज निश्चिंत होतो. आत्तापर्यंत काय झालं याचा विचार मी केला नाही.'
विराट पुढे म्हणाला की, 'माझ्याबरोबर हे 2014 साली देखील झालं होतं, पण मी त्याची तक्रार करणार नाही. मी कधी टीमच्या बाहेर गेलो तर कधी टीमला मॅच जिंकून दिली आहे. माझं काम टीमसाठी चांगली योगदान देणे हे आहे. मी मोहम्मद शमीचा पहिला बॉल खेळला तेव्हाच आजचा दिवस खास असल्याचं मला वाटलं. मी लेन्थ बॉल खेळू शकतो असं मला वाटतं. मला माझ्या शॉट्सवर विश्वास ठेवला पाहिजे हे माहिती होते. या संपूर्ण सिझनबद्दल मला कोणताही पश्चाताप किंवा तक्रार नाही कारण मला नेहमीच फॅन्सचं प्रेम मिळालं आहे,' असं विराटनं स्पष्ट केलं.
IPL 2022 : RCB ला मिळाली नशिबाची साथ, पहिलाच बॉल स्टम्पला लागूनही मॅक्सवेल NOT OUT! VIDEO
गुजरात टायटन्सवरील विजयानंतरही आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यात शनिवारी महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, पण जर मुंबईने हा सामना गमावला तर मात्र आरसीबीच्या प्ले-ऑफला पोहचण्याच्या स्वप्नांचा चुराडा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.