मुंबई, 7 मे : क्रिकेटमध्ये खेळाडूंचं नशीब बदलण्यास वेळ लागत नाही. एखादी मॅच किंवा सीरिज जिंकून देणारा खेळाडू काही दिवसांनी खराब खेळामुळे टीमसाठी व्हिलन ठरतो. त्याचबरोबर कधी सुमार कामगिरी करणारा खेळाडूही त्याच्या खेळाचा स्तर उंचावत मॅचचा हिरो ठरतो. या आयपीएल सिझनमधील (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) दुसऱ्या विजयाचा शिल्पकार असलेल्या डॅनियल सॅम्सनं (Daniel Sams) देखील महिनाभरात व्हिलन ते हिरो असा प्रवास केला आहे. मुंबई इंडियन्सच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरनं कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (MI vs KKR) झालेल्या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 35 रन दिले होते. केकेआरच्या पॅट कमिन्सनं (Pat Cummins) सॅम्सची धुलाई केली होती. या खराब बॉलिंगमुळे सॅम्सवर जोरदार टीका झाली. त्याला काही मॅच बाहेरही बसावं लागलं. आता याच सॅम्सनं शुक्रवारच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत मुंबईला 5 रननं थरारक विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 177 रन केले होते. सॅम्स शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला तेव्हा गुजरात टायटन्सला विजयासाठी 9 रनची गरज होती. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया ही गुजरातची फिनिशर जोडी मैदानात असल्यानं मॅच त्यांच्याकडे झुकली होती. सॅम्सनं त्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन देत मुंबईला विजय मिळवून दिला. त्या ओव्हरमधील शेवटच्या दोन बॉलवर डेव्हिड मिलरला एकही रन करता आला नाही. मुंबई-गुजरातच्या सामन्यात रणवीर सिंगच्या लूकची चर्चा! हिटमॅनच्या सिक्सवर …. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी सलग 8 पराभव झाल्यानं ही टीम ‘प्ले ऑफ’ च्या रेसमधून बाहेर पडली आहे. तर गुजरातचा 11 सामन्यातील तिसरा पराभव आहे. गुजरातची टीम अजूनही 16 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.