मुंबई, 2 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची सुरूवात 26 मार्च रोजी झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 6 विकेट्सनं पराभव करत पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या आयपीएल सिझनमधील ही आठवी मॅच होती. यंदाच्या सिझनमधील आठ पैकी सात मॅचमध्ये दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीम विजयी झाली आहे. शुक्रवारी देखील टॉस जिंकल्यानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालचीही टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याची इच्छा होती. मुंबईत संध्याकाळी मैदानात मोठ्या प्रमाणात दव पडत आहे. त्याचा फायदा दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमला मिळतोय. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनंही ही बाब मान्य केली आहे. त्याने टॉस जिंकल्यानंतर वानखेडेच्या पिचचं वर्णन स्विमिंग पूल (Swimming Pool) असं केलं आहे. ‘आम्हाला स्वाभाविकच बॉलिंग करायची आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये इथे स्विमिंग पूल झालेला असतो,’ असे अय्यरनं टॉसच्या वेळी सांगितले. मैदानात पडणाऱ्या दवाची तुलना श्रेयसनं स्विमिंग पूलशी केली आहे. वानखेडेच्या पिचवर आत्तापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत. तीन्ही मॅचमध्ये दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीम विजयी झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये केकेआरनं सीएसकेचा 6 विकेट्सनं पराभव केला. तर दुसऱ्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायंट्सला 5 विकेट्सनं हरवलं. गुजरातला शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 रन करायचे होते. त्यावेळी मैदानावर पडलेल्या दवमुळे ऑफ स्पिनर दीपक हुड्डाला नीट बॉलिंग करता आली नाही. त्याच्या 16 व्या ओव्हरमध्ये 22 रन निघाले. त्याच ठिकाणी ही मॅच टर्न झाली. IPL 2022: आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर KKR चा पंजाबवर शानदार विजय फ्लेमिंगनंही व्यक्त केली नाराजी मुंबईतील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करणारा श्रेयस अय्यर हा एकमेव व्यक्ती नाही. चेन्नई सुपर किंग्सचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनीही लखनऊ सुपर जायंट्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईतील ब्रेबॉर्न पिचवर नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानाची अवस्था नायगरातील धबधब्यासारखी झाली होती, असे फ्लेमिंगने म्हंटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.