मुंबई, 29 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याची ही आक्रमकता बॅटींग करताना नाही तर कॅप्टनसी करताना दिसू लागली आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या मॅचमध्ये (Delhi Capitals vs Rajasthan Royals) त्यानं अंपायरशी घातलेला वाद ताजा आहे. या प्रकरणामुळे त्याची संपूर्ण मॅच फिस कापून घेण्यात आली होती. त्यानंतरही पंतला शहाणपण आलेलं नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (KKR) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये पंतनं पुन्हा एकदा नो बॉलच्या प्रश्नावर अंपायरशी वाद घातला. केकेआरच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. दिल्लीकडून ललित यादव ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरचा तिसरा बॉल ललितनं फुलटॉस टाकला. त्यावर नितिश राणानं सिक्स लगावला. अंपायरनं उंचीच्या कारणामुळे तो नो बॉल असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पंत नाराज झाला. त्यानं फिल्ड अंपायर अनिल चौधरीशी या विषयावर वाद घातला. थोड्याच वेळात स्क्रिनवर दिसलेल्या रिप्लेमध्ये अंपायरचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे केकेआरला फ्री हिट मिळाली. ललित यादवनं पुढचा बॉल योग्य टप्प्यावर टाकल्यानं नितिश राणाला फ्री हिटवर फक्त 1 रन काढता आला. कुलदीप यादवच्या भेदक बॉलिंगच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 4 विकेट्सनं जिंकला. दिल्लीचा या आयपीएल सिझनमधील हा चौथा विजय आहे.
काय होते प्रकरण? राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या मॅचमध्ये दिल्लीच्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरनं ‘नो बॉल’ न दिल्यानं कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishbah Pant) खेळाडूंना परत येण्याचा इशारा केला. इतकंच नाही तर दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) यांनी मैदानात धाव घेत निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरनं रचला इतिहास, रोहितला मागं टाकत बनला आयपीएलमधील पहिला खेळाडू! आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि प्रविण आमरे यांना त्यांनी शिक्षा सुनावली आहे. या सर्व प्रकाराबद्दल पंतचे राजस्थान विरूद्धच्या मॅचचे शंभर टक्के मानधन कापण्यात येणार आहे. पंतला साथ देत हात वर करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे 50 टक्के मानधन कापण्यात येणार असून आमरेंवर मॅच फिसची शंभर टक्के रक्कम आणि एका मॅचची बंदी घालण्यात आली.