मुंबई, 14 एप्रिल : आयपीएल स्पर्धा सुरू असताना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि टीम इंडियासाठी एक काळजीची बातमी उघड झाली आहे. फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आणखी 4 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2022) खेळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही सिझनमध्ये जोरदार कामगिरी केलेल्या दीपकची अनुपस्थिती हा टीम इंडियासाठी देखील मोठा धक्का असेल. दीपकला भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर बेंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दीपक आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळण्याची शक्यता होती, पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याला पाठीला पुन्हा दुखापत झाल्यानं त्याची आयपीएल खेळण्याची शक्यता मावळली होती. आता त्यानंतर ताज्या वृत्तानुसार तो आणखी 4 महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. दीपक चहर आयपीएल ऑक्शनमधील चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला सीएसकेनं 14 कोटींना खरेदी केले होते. त्याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका सीएसकेला बसला आहे. सीएसकेनं आत्तापर्यंत 5 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून 4 सामन्यांमध्ये पराभव सहन केला आहे. पॉईंट टेबलमध्ये सीएसके सध्या नवव्या क्रमांकावर आहे. चहरनं 2016 साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलंय. तो गेल्या काही सिझनमध्ये सीएसकेचा प्रमुख बॉलर आहे. ‘पॉवर प्ले’ मध्ये विकेट्स घेण्याचं त्याचं कौशल्य असून त्याच्या अनुपस्थितीमध्ये सीएसकेला मोठा फटका बसला आहे. चहरच्या अनुपस्थितीमध्ये सीएसकेनं एडम मिल्ने, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांचा ‘पॉवर प्ले’ मध्ये वापर केला आहे. त्यापैकी एकालाही आत्तापर्यंत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. IPL 2022 : पंजाबच्या खेळाडूनं गमावला संयम, Baby AB आऊट झाल्यानंतर केली शेरेबाजी, VIDEO टीम इंडियाकडून खेळताना चहरनं 7 वन-डेमध्ये 10 तर 20 टी20 इंटरनॅशनलमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. लोअर ऑर्डरमधील त्याची बॅटींगही सुधारलीय. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा फटका रविंद्र जडेजासह रोहित शर्मालाही बसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.