मुंबई, 24 जून: संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडने पटकावलं आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनल टेस्टमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या ऐतिहासिक विजेतेपदानंतर न्यूझीलंडची टीम मालामाल होणार आहे.
फायनल मॅचसाठी सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला होता. या दिवशी न्यूझीलंडने जोरदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. दिवसाच्या सुरुवातीलाच काईल जेमिसनने भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात दोन धक्के दिले. यानंतर अजिंक्य रहाणेही लवकर माघारी परतला. ऋषभ पंतने 41 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बोल्टला 3 विकेट मिळाल्या. काईल जेमिसनने 2 आणि नील वॅगनरने 1 विकेट घेतली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनं भेदक कामगिरी केल्यानं टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 170 रनवरच ऑल आऊट झाली.
न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची आवश्यकता होती. हे लक्ष्य त्यांनी दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडकडून केन विल्यमसननं नाबाद 52 तर रॉस टेलरनं नाबाद 47 रन काढले.
विजेत्या टीमला किती रक्कम मिळणार?
न्यूझीलंडने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने त्यांना 11.72 कोटी रुपये मिळणार आहे, तर उपविजेत्या टीम इंडियाला 5.85 कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाला 3.3 कोटी रुपये, चौथ्या क्रमांकावरच्या इंग्लंडला 2.5 कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरच्या पाकिस्तानला 1.5 कोटी रुपये मिळतील, तर इतर 4 टीमना प्रत्येकी 73-73 लाख रुपये देण्यात येतील.
WTC Final: पराभवानंतरही विराट कोहलीला पश्चाताप नाही, म्हणाला...
टेस्ट क्रिकेटमधील रंगत वाढवण्यासाठी आयसीसीने 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरूवात केली होती. या स्पर्धेत एकूण 9 टीमनी सहभाग घेतला होता. प्रत्येक टीम 6-6 सीरिज खेळणार होती, यातल्या 3 सीरिज घरच्या मैदानात तर 3 सीरिज परदेशात खेळायच्या होत्या. पण कोरोनामुळे अनेक सीरिज स्थगित कराव्या लागल्या. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये फायनल मॅच झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india