मुंबई, 10 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून विराट कोहलीला (Virat Kohli) हटवण्यात आले आहे. या विषयांवर माजी क्रिकेटपटू मत व्यक्त करत आहे. निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनीच त्यांच्या कार्यकाळात विराटची सर्वप्रथम टीम इंडियात निवड केली होती. आता विराटला हटवून रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन करण्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर्नल’ या नावाने क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या वेंगसरकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, ’ आता विराट कोहली टेस्टवर तर रोहित शर्मा वन-डे क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकेल. रोहितला वन-डेमध्ये बॅटर आणि कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. त्याने मुंबई इंडियन्सला अनेकदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच त्याला व्हाईट बॉल क्रिकेटची कॅप्टनसी यापूर्वी सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यानं चांगली कामगिरी केली आहे. विराटने वन-डे आणि टी20 मध्ये कॅप्टन म्हणून चांगले प्रदर्शन केले आहे. आता त्याच्या खांद्यावरील कॅप्टनसीचे ओझे उतरले आहे. तो सध्या जगातील सर्वश्रेष्ठ बॅटर्सपैकी एक आहे. तो यशस्वी आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीमनं काही संस्मरणीय कामगिरी केली आहे. त्याला आता टेस्ट क्रिकेटवर अधिक फोकस करता येईल. त्या क्रिकेटमध्ये खेळाडूची खरी परीक्षा होते.’ असे त्यांनी सांगितले. समुद्रात फेकणे योग्य नाही… दिलीप वेंगसरकर यांनी यावेळी निवड समितीला सल्ला देखील दिला आहे. ‘विराटला फक्त टेस्ट टीमचा आणि रोहितला वन-डे तसंच टी20 टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्त केल्यानं सर्व प्रश्न सुटणार नाहीत. निवड समितीनं भविष्याचा विचार केला पाहिजे. त्यांना आत्तापासून भावी कॅप्टन तयार करावा लागेल. ही गोष्ट फक्त कॅप्टनपदासाठी नाही तर खेळाडूंसाठीही लागू होते. निवड समितीनं सिनिअर खेळाडूंची जागा घेऊ शकतील असे बॅकअप खेळाडू तयार केले पाहिजेत. खेळाडूंना तयार करणे हेच त्यांचे काम आहे. बेंच स्ट्रेंथ मजबूत असेल तर खेळाडूंना निवृत्त झाल्यावर जास्त मोठे खेळाडू निवृत्त झाल्यावर टीमला जास्त फटका बसणार नाही. वेस्ट इंडिजचे उदाहरण पाहा, त्यांनी 15 वर्ष क्रिकेट विश्वावर राज्य केलं. पण आता ही टीम नंबर 1 वरुन अगदी तळाला गेली आहे.’ असा गंभीर इशारा वेंगसरकर यांनी दिला. रोहित शर्मानं कॅप्टन होताच दिली विराटबद्दल पहिली प्रतिक्रिया, म्हणाला… वेंगसरकर पुढे म्हणाले की, ‘मी निवड समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळी अनिल कुंबळेला (Anil Kumble) कॅप्टन केले आणि त्याचवेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि अन्य खेळाडूंना तयार केले. मी इशांत शर्माला तयार केले. त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवले. त्याला तिथं संधी मिळणार नाही, पण तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करेल हे मला माहिती होते. निवड समितीचे काम हे खेळाडूंना तयार करणे आहे. कोणत्याही खेळाडूला थेट समुद्रात टाकून त्याने पोहावे अशी अपेक्षा करता येत नाही. माझा यावर विश्वास नाही. तुम्हाला योग्य वेळी खेळाडूंना संधी द्यायला हवी.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.