नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: न्यूझीलंडचा भारत दौरा १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिली 3 T20 सिरीज (India vs New Zealand T20 Series) खेळवण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयने (BCCI)16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधारपदी निवड झाली आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. याचे कारण म्हणजे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित किंवा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यापैकी कोणाला कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवायचे याचा निर्णय अद्याप निवडकर्त्यांना घेता आलेला नाही.न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार कोण होणार यावरून रोहित आणि रहाणे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. कसोटी संघाचा नियमित कर्णधार कोहली दीर्घ कालावधीसाठि रजेवर गेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने आतापर्यंत कसोटी संघाची कमान सांभाळली आहे. मात्र, रहाणेचा अलीकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही आणि दुसरीकडे रोहित टी-20 संघाचा कर्णधार झाल्यानंतरही समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
रहाणेच्या फॉर्ममुळे कर्णधारपदाचा पेच
भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा पेचही यामुळे अडकला आहे. कारण गेल्या वर्षी आपल्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका जिंकून देणारा रहाणे तेव्हापासून मौन बाळगून आहे. रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी खेळी करता आली नाही. तेव्हापासून प्लेइंग-11 मधील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नवीन कर्णधाराबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मतही निवडकर्त्यांना जाणून घ्यायचे आहे. द्रविडचा दृष्टीकोन निवडकर्त्यांना कर्णधार निवडण्यात मदत करेल. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेसाठी संघ (Ind vs NZ कसोटी संघ) शुक्रवारी निवडला जाईल आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला कर्णधारपदासाठी विचारले जाऊ शकते.
रहाणे एक वर्षापासून फॉर्मशी झगडत आहे
गेल्या वर्षीच्या मेलबर्न कसोटीनंतर रोहित आणि रहाणेच्या फलंदाजीचे रेकॉर्ड बघितले तर हिटमॅनचा वरचष्मा दिसतो. यादरम्यान रोहितने 11 कसोटीत 48 च्या सरासरीने 906 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतकेही झळकावली. रहाणेला याच कालावधीत 11 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 19 च्या सरासरीने 372 धावा करता आल्या.