मुंबई, 18 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सगळीकडे फिफा वर्ल्ड कपचीच चर्चा सुरु असलेली पहायला मिळतेय. अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. यादरम्यान, मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे या जगातील दोन बड्या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या दोघांचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. जगभरात लाखो लोक कतारच्या स्टेडियममध्ये हा सामना पाहतील. फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहणे हे प्रत्येक फुटबॉल चाहत्याचे स्वप्न असते. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्यासाठी बॉलिवूड करही ग्लॅमरस तडका लावणार आहेत. यंदा कोण कोण स्टार फायनल मॅचच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत पाहुया. क्रिकेटनंतर, फुटबॉल हा भारतातील एकमेव खेळ आहे जो बहुतेक लोकांना पाहायला आणि खेळायला आवडतो. बॉलिवूड स्टार्सनाही फुटबॉलची खूप आवड आहे. फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही कतारला पोहोचले आहेत. कार्तिक आर्यन आज सकाळी कतारला रवाना झाला आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कार्तिकचा एक फोटो आहे, या फोटोमध्ये कार्तिक आर्यन फ्लाइटमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्या हातात कतारचे तिकीट आहे. याशिवाय नुकताच वरुण धवननेही फुटबॉल खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो अर्जेंटिनाच्या जर्सीत दिसत आहे. अर्जुन कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अर्जेंटिनाची जर्सी हातात घेऊन लिओनेल मेस्सीला सपोर्ट करताना दिसत आहे. अनन्या पांडे अर्जेंटिनाला सपोर्ट करताना दिसली.
याशिवाय नोरा फतेही, करिश्मा कपूर, शनाया कपूर, चंकी पांडे, आदित्य रॉय कपूर, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे देखील दिसणार आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अंतिम सामन्यादरम्यान त्यांच्या पठाण चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. यासोबतच तो या स्पर्धेचा आनंदही घेणार आहे. दरम्यान, फिफा वर्ल्ड कपच्या महासंग्रामातील अंतिम सामना आज होणार आहे. गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून इतिहास घडवण्याच्या इराद्याने फ्रान्स मैदानात उतरेल तर दुसरीकडे मेस्सी अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होईल अशी चाहत्यांना आशा आहे.