गिलॉन्ग, 16 ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेला टी20 वर्ल्ड कप च्या पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं. नामिबियानं टी20 क्रिकेटमध्ये तुलनेत बलाढ्य असलेल्या श्रीलंकेला 55 धावांनी पराभवाचा हा धक्का दिला आणि श्रीलंकेच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवातीलाच मोठा सुरुंग लावला. नामिबियानं श्रीलंकेला या सामन्यात 164 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान श्रीलंकेला पेलवलं नाही. त्यांचा अख्खा डाव नामिबियाच्या आक्रमणासमोर 108 धावात संपुष्टात आला. नामिबियासाठी हा सर्वात मोठा विजय ठरला कारण आयसीसीच्या टॉप टेन टी20 संघापैकी एका संघाला हरवण्याची ही नामिबियाची पहिलीच वेळ ठरली. श्रीलंकेची खराब सुरुवात नामिबियानं दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रींलंकेची सुरुवात मात्र खराब झाली. पथुन निसंका आणि कुशाल मेंडिस या जोडीला मोठी सलामी देता आली नाही. निसंका 9 तर मेंडिस 6 धावा काढून बाद झाला. तर त्यानंतर आलेला गुणतिलकाही पहिल्याच बॉलवर माघारी परतला. मग बॅटिंगमध्ये कमाल केलेल्या फ्रायलिंकनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये धनंजयची विकेट घेऊन श्रीलंकेची अवस्था 4 बाद 40 अशी केली होती. त्यानंतर कॅप्टन दसून शनाका आणि राजपक्षेनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी फुटली आणि श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. शनाकानं सर्वाधिक 29 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेच्या 7 खेळाडूंना दुहेरी धावसंख्या देखील उभारता आली नाही. नामिबियाकडून डेव्हिड व्हिसे, फ्रायलिंक, शॉल्झ आणि शिकोंगोनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर स्मिटनं एका बॅट्समनला माघारी धाडलं.
A historic win for Namibia 🔥#T20WorldCup | #SLvNAM | 📝 https://t.co/vuNGEcX62U pic.twitter.com/AvCsiz9X7K
— ICC (@ICC) October 16, 2022
नामिबियाचा संघर्षमय विजय यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात नामिबियानं एक मोठी कामगिरी बजावली. पण नामिबियाची सुरुवातही चांगली झाली नाही. 15व्या ओव्हरपर्यंत नामिबियाच्या खात्यात 6 बाद 95 धावाच जमा होत्या. पण शेवटच्या 5 ओव्हरमध्ये नामिबियानं टॉप गियर टाकला आणि धावसंख्या 7 बाद 163 वर नेऊन ठेवली. हेही वाचा - T20 World Cup: क्रिकेटचाहत्यांनो, टी20 वर्ल्डकप विषयीची ‘ही’ गोष्ट तुम्हाला माहित आहे का? शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 धावा हाणामारीच्या ओव्हर्समध्ये श्रीलंकन गोलंदाजांची लाईन आणि लेंथ नामिबियाच्या फ्रायलिंक आणि स्मिट या जोडीनं बिघडवून टाकली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यामुळे नामिबियाला 7 बाद 163 धावांची मजल मारता आली. फ्रायलिंकनं 28 बॉल्समध्ये 44 तर स्मिटनं नाबाद 31 धावा केल्या. या जोडीनं शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 धावा फटकावल्या. श्रीलंकेकडून मधुशाननं 2 तर हसरंगा, चमिरा, तीक्षणा आणि करुणारत्नेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.