मुंबई, 01 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची निवड जाहीर केली. यामध्ये भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंची वर्णी लागली आहे. यात अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. हे तिघेही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्द मोठी नसली तरी मंडळाने त्यांना आता संधी दिली आहे.
क्रिकेट सल्लागार समितीमध्ये बीसीसीआय़ने अशोक आणि जतीन यांचा समावेश नव्याने केला आहे. तर सुलक्षणा नाईक यांना कायम ठेवण्यात आलं आहे. याआधीही त्या क्रिकेट समितीच्या सदस्या होत्या. जतीन परांजपे यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर प्रथम श्रेणीत 95 डावात त्यांनी 3 हजार 964 धावा केल्यात. यात त्यांनी 13 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय लिस्ट एच्या 44 सामन्यात 1040 धावा करताना 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा : स्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान
भारतीय संघाला टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर बीसीसीआय़ने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील समितीची हकालपट्टी केली होती. त्यानतंर अर्ज मागवण्यात आले होते. आता अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांची त्रिसदस्यीय समिती नव्या अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्ती प्रक्रियेत सहभागी होईल.
हेही वाचा : बांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित? कर्णधारही बदलणार
अशोक मल्होत्रा यांनी इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. तर जतीन परांजपे हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत होते. सुलक्षणा नाईक या मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीत सदस्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Team india